मुंबई – १९९९ ला पक्षाची स्थापना झाल्यानंतर पुढील सर्व निवडणुका काँग्रेससोबत एकत्र लढवल्या मग २०१४ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी वेगळे लढण्याचे कारण काय? एकीकडे शिवसेना-भाजपा वेगळी झाली होती. मग काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्रित लढली असती तर बहुमताने निवडून आलो असतो मग आपण वेगळे कसे झालो? काय चर्चा झाली? अचानक निर्णय कसे होतात. अजित पवार पहाटे शपथविधीला गेले हा निर्णय का झाला आणि कुणामुळे झाला? गुगली टाकली पण आपल्याच गड्याला आऊट केलं. हे जनतेला सांगितले पाहिजे असं सांगत भुजबळांनी पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा दावा केला.
मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, २०१७ सालीही सरकारमध्ये जाण्याचा प्रयत्न झाले. २०१९ ला अजितदादा सकाळी उठले आणि शपथविधीला गेले हे जनतेला सांगितले पाहिजे. वारंवार आपण दिल्लीत चर्चा करायची, काही दिवसांनी त्यातून माघार घ्यायची आणि अनेक नेत्यांना तोंडघशी पाडतोय याचेसुद्धा आपल्याला लक्षात कसे आले नाही. आम्ही भाजपात प्रवेश केला नाही. नागालँडमध्ये तिथल्या स्थानिक पक्षाचा मुख्यमंत्री झाला त्याच्या नेतृत्वाखाली भाजपा मंत्रिमंडळात गेला. आपले ७ आमदार त्यांनाही भाजपा सरकारमध्ये सामील व्हा असं सांगितले. मग आम्ही सामील झालो तर काय फरक? १० जूनला त्या आमदारांचा सत्कार झाला. मग आमचाही सत्कार करा, तिरस्कार का करता? आपली विचारधारा ती कायम राहिली पाहिजे. धरसोड वृत्ती राजकारणात चालणार नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच १९९९ साली ज्यावेळी पक्षाची स्थापना झाली. राज्याचे अध्यक्षपद माझ्याकडे होते. ३ महिने झाल्यानंतर इंडिया शायनिंग म्हणून लोकसभेसोबत ६ महिने अगोदर विधानसभेची निवडणूक घेतली. आम्ही ताकदीने काम केले. वेळ मिळाला असता तर महाराष्ट्राचा नंबर १ पक्ष राष्ट्रवादी बनला असता. त्यानंतर काँग्रेससोबत समझोता करून सरकारमध्ये आलो. उपमुख्यमंत्री बनलयानंतर १ महिन्यात प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पण आता ५ वर्ष प्रदेशाध्यक्ष एकच. पक्षातंर्गत निवडणुका घेतल्या नाहीत. भाकरी फिरवायची आहे मग त्यांना बदललं का नाही. मग हळूहळू हे सुरू झाले असंही भुजबळ यांनी म्हटलं.
दरम्यान, महाराष्ट्राच्या भल्यासाठी, स्वत:च्या स्वार्थासाठी सरकारमध्ये आलो नाही. आम्ही तुरुंग भोगून आलोय. केसही रद्द झाली. अजित पवार, सुनील तटकरे यांच्यावरही गुन्हे रद्द झालेत. कोणत्या नेत्यांवर केस आहेत मग आमच्यावर ठपका नको. काही नेत्यांनी, सर्व आमदारांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला हे खरे आहे. परंतु जसजशी भाषणे होतील त्यात बऱ्याच गोष्टींचा उलगडा होईल. ४० पेक्षा जास्त आमदार आमच्या पाठिशी आहे. या सर्व आमदारांची प्रतिज्ञापत्रावर सह्या झाल्या आहेत. आमच्यावर कारवाई होईल असं काही सांगतात. मी शरद पवारांसोबत ५७-५८ वर्ष काम करतोय. नियमांच्या बाहेर जाऊन आम्ही काम कसं करू. कायदे आम्हालाही कळता. त्यामुळे ही कारवाई होईल असं बोलतायेत. परंतु या सर्व गोष्टींचा विचार करून पुढे पाऊल टाकले आहे असं छगन भुजबळ यांनी म्हटलं.