अतुल कुलकर्णी मुंबई : छगन भुजबळ यांचा शिवसेनाप्रवेश सेना नेत्यांच्या वादावादीमुळे रखडला आहे. त्यांना कोणते पद द्यायचे, कोठून उमेदवारी द्यायची, ही विलंब होण्यास कारणे आहेत. एकेकाळी भुजबळ व नारायण राणे हे शिवसेनेचे तुल्यबळ नेते होते. मात्र एकाने राष्ट्रवादीत तर दुसऱ्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पुढे राणे भाजपतर्फे खासदार झाले असले तरी त्यांनी स्वाभिमान पक्ष कायम ठेवला. त्यांना भाजपमध्ये जाताना तीन विधानसभा मतदारसंघांत उमेदवारी हवी असतानाच भुजबळ यांच्या सेनाप्रवेशाची चर्चा सुरू झाली. भुजबळ यांना प्रवेश दिल्यास आपल्या ज्येष्ठतेचे काय या शंकेमुळे काहींनी विरोधाचे उद्योग सुरू केले. भुजबळ यांना नेतेपद द्यावे लागेल, कारण ते आधीहीे नेते होते. पुन्हा प्रवेश देताना त्यांना नेतेपद द्यायचे का? यावर पक्षात एकमत नाही.
बाळासाहेब ठाकरे यांना भुजबळ यांनी अटक केली होती, मग त्यांना प्रवेश का द्यावा? असे प्रश्न विचारत आहेत. प्रवेश देण्यास उत्सुक असणाऱ्यांनी त्यांच्याकडून फारतर माफीनामा घ्या, म्हणजे कार्यकर्तेही समाधानी होतील असा सूर लावला आहे. अटकेनंतर भुजबळ व बाळासाहेब यांच्यातील कटुता दूर झाली. भुजबळ मातोश्रीवर गेले. त्यांचे तिथे स्वागत झाले. हे माहिती असूनही हा वाद काही नेते काढत आहेत. आपल्यामुळे भुजबळ यांचा सेनाप्रवेश व्हावा, असे काहींना वाटते. राणे यांना भाजपने प्रवेश देऊ नये, अशी टूम सेनेच्या काही नेत्यांनी काढली आहे. राणे यांना सेनेने विरोध केल्यास भुजबळ यांना भाजपमधून विरोध असे चित्र निर्माण होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मौन धारण केले आहे.माझ्या पक्षप्रवेशाच्या बातम्या निदान मला तरी विचारून द्या. मला राज्यभरातून कार्यकर्त्यांचे फोन येत आहेत. त्याचा मला त्रास होत आहे.- छगन भुजबळ