छगन भुजबळांची नाशिकमधून माघार; पंतप्रधान मोदी, शाह दाेघांचेही मानले आभार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 10:36 AM2024-04-20T10:36:49+5:302024-04-20T10:38:25+5:30

उमेदवारीसाठी आग्रह धरल्याबद्दल पंतप्रधान मोदी, अमित शाह दाेघांचेही मानले आभार

Chhagan Bhujbal's retreat from Nashik Thanks also to Prime Minister narendra Modi, amit Shah | छगन भुजबळांची नाशिकमधून माघार; पंतप्रधान मोदी, शाह दाेघांचेही मानले आभार

छगन भुजबळांची नाशिकमधून माघार; पंतप्रधान मोदी, शाह दाेघांचेही मानले आभार

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारीसाठी आग्रह धरूनही नाशिक मतदारसंघाबाबत महायुतीत निर्णय होत नसल्याने नाराजी व्यक्त करत अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीतून माघारी घेत असल्याची घोषणा शुक्रवारी केली. मी नाशिकमधून लढवावी असे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी सुचवले होते. त्यांनी दाखवलेल्या आग्रहाबद्दल मी आभार मानतो, असेही भुजबळ म्हणाले. 
   
ते म्हणाले की, होळीच्या दिवशी अजित पवारांनी मला दिल्लीचा निरोप दिला. दिल्लीत गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीत समीर भुजबळ यांच्यासाठी नाशिकची जागा मागितली. मात्र शाह यांनी माझे नाव पुढे केल्याचे अजित पवारांनी सांगितले. मी निर्णय घेण्यासाठी वेळ मागितला. मात्र दुसऱ्या दिवशी माझे नाव अंतिम झाल्याचे सांगण्यात आले.  

महायुतीचे नुकसान होऊ नये म्हणून... 
मराठा, दलित, ब्राह्मण, ओबीसी यासह सर्व समाजाने पाठिंबा दिल्याने आम्ही निवडणुकीची तयारी करण्यास सुरुवात केली. मात्र तीन आठवड्याचा वेळ होऊनही उमेदवारी जाहीर झाली नाही. महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार देखील सुरू झाला असून तीन आठवड्यापासून ते मतदारसंघात फिरत आहेत. अधिक उशीर होत असल्याने महायुतीचे नुकसान होऊ शकते त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे सर्वांच्या मनातील संदिग्धता दूर करण्यासाठी आपण माघार घेत असल्याचे त्यांनी सांगितले. 

गोडसेंकडून स्वागत 
भुजबळ यांनी घेतलेल्या निर्णयाचे शिंदेसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी स्वागत केले आहे. आता शिंदेसेनेकडून लवकरच उमेदवारी घोषित होईल, असा विश्वास गोडसे यांनी व्यक्त केला. 

Web Title: Chhagan Bhujbal's retreat from Nashik Thanks also to Prime Minister narendra Modi, amit Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.