शिवसेना-भाजपात चिखलफेक, नालेसफाईवरून आरोप-प्रत्यारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 06:59 AM2018-05-17T06:59:20+5:302018-05-17T07:00:07+5:30
पावसाळ्यापूर्वीच या वर्षी नालेसफाईवरून शिवसेना-भाजपात चिखलफेक सुरू झाली आहे. यंदा मुंबईत पाणी तुंबल्यास महापालिका नव्हे, तर मेट्रो रेल्वेची कामे जबाबदार असतील, असे म्हणत मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
मुंबई : पावसाळ्यापूर्वीच या वर्षी नालेसफाईवरून शिवसेना-भाजपात चिखलफेक सुरू झाली आहे. यंदा मुंबईत पाणी तुंबल्यास महापालिका नव्हे, तर मेट्रो रेल्वेची कामे जबाबदार असतील, असे म्हणत मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. महापौरांच्या या वक्तव्याला भाजपानेही चोख प्रत्युत्तर दिले आहे. राज्य सरकार आणि मुख्यमंत्री यांच्याविरोधात बोलले की खमंग प्रसिद्धी मिळते. त्यामुळे आपली खुर्ची शाबूत ठेवण्यासाठी असे आरोप करण्यात येत असल्याचे भाजपाने म्हटले आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपात आता नवीन वादाला तोंड फुटले आहे.
मुंबईत पावसाळ्यापूर्वी नाल्यांची सफाई सुरू करण्यात आली आहे. या सफाईकामाची पाहणी महापौरांनी बुधवारी केली. या वेळी पत्रकारांशी बोलताना महापौरांनी मेट्रोच्या कामामुळे मुंबईत पाणी तुंबण्याचा धोका असल्याचे मत व्यक्त केले. मेट्रोच्या कामासाठी महापालिकेच्या पर्जन्यवाहिन्या तोडण्यात आल्या आहेत, काही ठिकाणी त्या उखडल्या गेल्या आहेत. या पर्जन्यवाहिन्या दुरुस्त करून देण्याऐवजी त्या तशाच ठेवल्या जात आहेत. तसेच मेट्रोच्या खोदकामांमुळे अनेक ठिकाणी खड्डे पडल्याचे महापौरांनी सांगितले. त्यांच्या या आरोपांचे खंडन भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी केले. यापूर्वी मुंबई कधी तुंबली नव्हती का? नालेसफाईतील भ्रष्टाचार, वजनकाट्यातील मापातील पाप भाजपानेच बाहेर काढले असल्याचा दावाही त्यांनी केला. महापौरांनी नाल्यात उतरून काय पाहिले आणि काठीने गाळ कसा मापला हे सांगावे. ते न सांगता मेट्रोच्या कामामुळे पाणी तुंबेल, अशी भीती व्यक्त करीत आहेत. हे एक प्रकारे भ्रष्ट अभियंते आणि ठेकेदारांना पाठीशी घालण्यासारखेच आहे. अशा महापौरांना सरकार आणि मेट्रोच्या कामाबाबत बोलण्याचा अधिकार नाही, असे कोटक यांनी सुनावले आहे.
>भाजपाचा सेनेला सवाल
२६ जुलै २००५ला मुंबई तुंबली होती तेव्हा मेट्रोची खोदकामे कुठे सुरू होती. २०१०, २०१२मध्येही मुंबईत पाणी तुंबले. तेव्हा मेट्रोची कामे कुठे सुरू होती? ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाची अनेक नाले रुंदीकरणाची कामे अपूर्ण आहेत. काही पम्पिंग स्टेशन्स मुदत संपूनही पूर्णच झालेली नाहीत. जी सुरू झाली आहेत, ती चालत नाहीत, असे भाजपाने निदर्शनास आणत शिवसेनेची कोंडी केली आहे.
मेट्रोचे काम डोळ्यांत खुपते
मेट्रोची सुरू असलेली कामे झपाट्याने होत असल्यानेच ती डोळ्यांत खुपत आहेत. त्यामुळेच ते वैफल्यग्रस्त झाले असून, त्यातूनच असे बेलगाम आरोप होत आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करून जी नालेसफाईची कामे केली जात आहेत, त्यामुळे पाणी तुंबणार नाही, याची चिंता महापौरांनी करावी, मेट्रोच्या कामांकडे पाहण्यास मुख्यमंत्री सक्षम आहेत, असे भाजपाने म्हटले आहे.