Join us

19 नोव्हेंबरला जुहू चौपाटी येथे छठ पूजेचे आयोजन

By मनोहर कुंभेजकर | Published: November 18, 2023 4:38 PM

ही  छठपूजा सायं. ४ ते १० वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.

मुंबई- दरवर्षीप्रमाणे यावर्षीही संजय निरुपम आणि बिहारी फ्रंटच्या वतीने उद्या रविवार दि. 19 रोजी ‘‘छठ पूजा २०२३’’ चे आयोजन मुंबईतील जुहू चौपाटी येथील हॉटेल पामग्रोव्ह येथे केले आहे. ही  छठपूजा सायं. ४ ते १० वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.

सदर छठ पूजेत सारेगामापा विजेता एश्वर्य निगम आणि इंडियन आइडल फेम दिपाली सहाय तसेच सुप्रसिद्ध भोजपुरी लोकगायिका गायिका सुश्री चंदन तिवारी आणि गायिका श्रुती झा यांचे लोकगीत आणि भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

याबद्दल अधिक माहिती देताना या  छठपूजेचे आयोजक संजय निरुपम म्हणाले की, मुंबईमध्ये राहणाऱ्या उत्तर भारतीयांसाठी छठपूजा हे एक महापर्व असते. दरवर्षी प्रमाणे बिहारी फ्रंट आणि मुंबई काँग्रेसच्या वतीने  छठपूजा २०२३ या पर्वाचे आयोजन आम्ही जुहू चौपाटी येथे केले आहे. श्रद्धा आणि भक्तीच्या या अनंतयात्रेचे हे २६वे वर्ष आहे. या महापर्वामध्ये सहभागी होणाऱ्या छठ व्रतीयांसाठी सर्व सोयी सुविधांची व्यवस्था जुहू चौपाटीवर करण्यात आलेली आहे. तसेच भोजपुरी आणि मैथिली भाषेतील भजन व कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले आहे. मी स्वतः व माझे सहयोगी बांधव सायंकाळी ६.०० वाजता सूर्य देवतेला अर्घ्य अर्पण करणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी आमच्या बरोबर या महापर्वात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे. 

संजय निरुपम म्हणाले की, महानगर पालिकेने छठपूजेच्या दिवशी जुहू चौपाटीवर भाविकांना पिण्याचे पाणी, फिरते शौचालय आणि पोलीस प्रशासनाच्यावतीने भाविकांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.

टॅग्स :संजय निरुपममुंबई