मुंबई : छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख स्वराज्यरक्षक केल्यामुळे अजित पवारांवर शिंदे गट-भाजपच्या आमदारांनी जोरदार टीका केली होती. मात्र याच सरकारने छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख स्वराज्यरक्षक असा केला आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात सोमवारी झाल्यानंतर सरकारने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृृहात पुरवणी मागण्या मांडल्या. या पुरवणी मागण्यांमध्ये "स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान व समाधी स्थळ विकास आराखडा" असा उल्लेख करण्यात आला आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हे तर स्वराज्यरक्षक होते, असा उल्लेख विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत केला होता.
मात्र संभाजीराजे धर्मवीर होते असे सांगत भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली होती. या टीकेनंतरही अजित पवार हे आपल्या भूमिकेवर ठाम होते. भाजप आणि शिंदे गटातील आमदारांनी अजित पवारांवर टीका केल्यानंतरही सरकारच्या कामकाजात छत्रपती संभाजी महाराजांचा स्वराज्य रक्षक असाच उल्लेख करण्यात आला आहे.