‘अशा’ प्रवृत्तीचा बंदोबस्त जागीच केला पाहिजे; शिवप्रेमींच्या संतापाला छत्रपती संभाजीराजेंचा फुल्ल सपोर्ट!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 03:22 PM2020-03-20T15:22:54+5:302020-03-20T15:23:41+5:30
मी कायदा मानणारा, कायद्याचे पालन करणारा, शिवरायांचा वंशज आहे. पण ह्या प्रकरणात माझा सुद्धा संयम सुटला होता
मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्याला शिवप्रेमींनी चोप दिला. सोशल मीडियात शिवप्रेमींच्या या कृत्याचं समर्थन करणाऱ्या अनेक पोस्ट पडत आहेत. अशातच छत्रपती घराण्याचे वंशज असणारे भाजपा खासदार संभाजीराजे भोसले यांनीही शिवप्रेमींच्या संतापाला फुल्ल सपोर्ट असल्याचं जाहीर केलं आहे.
याबाबत संभाजीराजेंनी फेसबुक पोस्ट लिहून म्हटलं की, विमानातून बाहेर आलो आणि मोबाईल मध्ये शिवभक्तांनी छत्रपती घराण्याची बदनामी करणाऱ्या इसमाला चोप दिलेले व्हिडीओ पाहायला मिळाले. माझ्या सुद्धा मनातली इच्छा पूर्ण झाल्याचे समाधान वाटले. अशा प्रवृत्तीच्या लोकांचा बंदोबस्त जागीच केला तर दुसरा कुणी धाडस करणार नाही अशा शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
तसेच मी कायदा मानणारा, कायद्याचे पालन करणारा, शिवरायांचा वंशज आहे. पण ह्या प्रकरणात माझा सुद्धा संयम सुटला होता. मी त्या सर्व शिवभक्तांच्या पाठीमागे ठाम उभा आहे ज्यांनी कामगिरी केली. माझ्यासारखे कोट्यवधी शिवभक्त तुमच्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत. ही मोहीम फत्ते करणाऱ्या सर्व शिवभक्तांचे मनापासून अभिनंदन करतो असंही छत्रपती संभाजीराजेंनी सांगितले आहे.
फेसबुकवर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या या इसमाचं नावं जितेंद्र राऊत असं आहे. अनेकदा फेसबुकवर राऊत याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल खालच्या भाषेत शब्दप्रयोग केले होते. त्याच्या पोस्टवर येणाऱ्या प्रतिक्रियेवरही जितेंद्र राऊत हा चिथावणीखोर विधान करत होता. शिवप्रेमींना अनेकदा जितेंद्र राऊतांविरोधात पोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र राऊत याने लिखाण करणं सोडलं नाही.
छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याविषयी अत्यंत खालच्या शब्दात जितेंद्र राऊत पोस्ट करत होता. महाराजांची बदनामी करणारे लिखाण केले जात होते. शिवप्रेमींनी अनेकदा त्याच्याशी संपर्क साधला असता तो उडवाउडवीची उत्तरे देत असे. अखेर आज शिवप्रेमींना जितेंद्र राऊताला पकडून चांगलाच चोप दिला. इतकचं नाही तर राऊत याच्या तोंडाला काळं फासून त्याची धिंड काढण्यात आली. त्यानंतर त्याला पोलीस ठाण्यात घेऊन गेले.
छत्रपती शिवरायांबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह लिहिणाऱ्या ‘त्याला’ शिवप्रेमींनी चोपला अन्...