मुंबई : पुण्यातील एक कंपनी संभाजी बिडी नावाने बिडीचे उत्पादन करत असून ते बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीसही आहे. मात्र, छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने बिडीचे उत्पादन करणे योग्य नसून हा छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान असल्याच्या संतत्प भावना शिव-शंभूप्रेमींकडून व्यक्त होत आहेत. संभाजी ब्रिगेडनेही या नावावर आक्षेप घेतला होता. आता, आमदार रोहित पवार यांनीही या कंपनीला सूचना केल्या आहेत. संभाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर करु नका, असे पवार यांनी सुनावले आहे.
आमदार रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने पुण्यात बिडी उत्पादन करणाऱ्या कंपनीला हे अक्षम्य चुकीचं असल्याचं म्हटलंय. लोकभावनेचा विचार करुन संबंधित कंपनीने छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर तातडीने थांबवावा, अशी सूचनाही रोहित पवार यांनी केली आहे. यावर अनेकांनी रोहित पवारांच्या विचाराला सहमती दर्शवली आहे. मात्र, एका ट्विटर युजर्सने रोहित पवारांनाच सवाल केला आहे. संभाजी नावाने कंपनीची नोंदणी असेल तर, त्यास सरकारनेच परवानगी दिली आहे. त्यात गैरवापर काय? असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच, या कंपनीत कित्येक गरीब लोकं काम करतात. या गरिबांचं पोट शंभूराजेंच्या नावाने चालवणाऱ्या कंपनीमार्फत भरत असेल तर त्यात बिघडलं कुठं? असा सवाल @swapnilkharat या ट्विटर युजर्सने उपस्थित केला आहे.
दरम्यान, शिरोली येथे गेल्याच आठवड्यात, संभाजी ब्रिगेडच्या दणक्याने संभाजी विडी या नावाने तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या पुण्यातील कंपनीने सुमारे १९ लाखांचा माल परत पाठवण्यात आला. संभाजी विडी या नावाने पुण्याहून कोल्हापूरला विक्रीला हा माल आला होता. हे संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सुमारे १९ लाखांचा माल व्यावसायिकांच्याकडून ताब्यात घेऊन ट्रान्सपोर्टने पुुन्हा पुण्याला कंपनीला पाठवला. संभाजी नावाने विडी विक्री करायची नाही, असा इशाराही संबंधित कंपनी आणि व्यावसायिकांना संघटनेने दिला आहे.
कोल्हापुरातील आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद
संभाजी बिडी विरोधातील संभाजी ब्रिगेडच्या आंदोलनाला सोमवारी कोल्हापुरातील व्यापारी वर्गाने उत्स्फूर्त सकारात्मक प्रतिसाद देत आपल्याकडील शिल्लक सर्व मालसुद्धा कंपनीला परत पाठवण्याचा निर्णय घेतला आणि सुमारे १० लाखांचा माल ट्रान्सपोर्टने पुण्याला परत पाठवला. जिल्हा पानपट्टी असोसिएशन यांनी सुद्धा इथून पुढे संभाजी विडीची खरेदी-विक्री करणार नसल्याचे जाहीर केले आहे. इथून पुढे भविष्यात महापुरुषाच्या नावाने असलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री आणि खरेदी करणार नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
व्यापाऱ्याला चोप दिला
छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय महापुरुष आहेत त्यांनी आपल्या संपूर्ण जीवन काळामध्ये कोणत्याही प्रकारचे व्यसन केले नाही आणि त्याच महापुरुषाच्या नावाने कोणी तंबाखूजन्य पदार्थ विकत असेल तर ही गोष्ट अत्यंत खेदजनक आहे. जिल्ह्यातील व्यापारी वर्गाने महापुरूषांच्या नावाने येणारा माल खरेदी करू नये. आणि कोणत्याही कंपनीने महापुरूषांच्या नावाने तंबाखूजन्य माल विक्री केल्यास त्याला सडेतोड उत्तर देऊ - रुपेश पाटील,जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड.