मुंबई- छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला आहे. रायगडावर त्यांचे बालपण गेलं आहे. स्वराज्याची शपथ महाराजांनी रायगडावर घेतल्याचं विधान भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी केलं आहे. प्रसाद लाड यांच्या या विधानावरुन राज्यात पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली आहे. तसेच विरोधकही आक्रमक झाले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलण्याची यांची लायकी नाही; संजय राऊतांनी प्रसाद लाड यांना सुनावले!
छत्रपती संभाजीराजे देखील आक्रमक झाले आहेत. प्रसाद लाड मूर्ख माणूस आहे. हे जबाबदार व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अशी विधाने कसं काय करु शकतात?, असं संतप्त सवाल छत्रपती संभाजीराजे यांनी उपस्थित केला आहे. तुम्ही एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज दैवत आहेत, आरध्य आहेत..असं म्हणतात आणि दूसरीकडे अशी विधाने करतात. तुम्हाला समजत नसेल, तर बोलू नका, अशी टीका संभाजीराजे यांनी केली.
भाजपातील नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान येऊ लागली आहे. त्यामुळे यामागे काही षडयंत्र आहे की काय?, असा प्रश्न आता मला पडू लागला आहे, असं संभाजीराजे म्हणाले. सामान्य नागरिकांकडूनही अशी चूक होणार नाही आणि जबाबदार व्यक्ती अशी चूक करतोय, असं म्हणत संभाजीराजे यांनी प्रसाद लाड यांनी सुनावले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हुशार आणि जबाबदार व्यक्तीमत्व आहे. त्यांच्याकडून अशा चूका होत नाही, मग यांच्याकडून कशा होतात?...त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना आपल्या नेत्यांना ताकीद द्यावी, असा सल्ला देखील संभाजीराजेंनी दिला आहे.
दरम्यान, छत्रपती शिवराय हे संपूर्ण विश्वाचे आराध्य दैवत आहेत. महाराजांची कर्मभूमी कोकण होती, स्वराज्याची मुहूर्तमेढ कोकणात रोवली गेली हे देखील विसरून चालणार नाही. अनावधानाने माझ्याकडून दुसरा शब्द प्रयोग झाला. परंतू, त्वरित चूक दुरुस्त केल्याचे प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे. विश्वाचे आराध्य दैवत शिवरायांचा सन्मान आम्ही यापुढेही ठेवणार. कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, असे प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"