'...तर मी सहन करु शकणार नाही'; मराठा क्रांती मोर्चाच्या विधानावर संभाजीराजेंचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 10:18 AM2022-08-28T10:18:34+5:302022-08-28T10:18:57+5:30

माझे प्रामाणिक कार्य पाहून कित्येक संघटनांनी, लोकांनी अनेकवेळा माझ्याकडे नेतृत्व दिले, पण कधीही मी स्वतःहून हे नेतृत्व स्वीकारले नाही, असं संभाजीराजे यांनी स्पष्ट केलं आहे. 

Chhatrapati Sambhaji Raje has clarified his stance on Maratha reservation through a Facebook post. | '...तर मी सहन करु शकणार नाही'; मराठा क्रांती मोर्चाच्या विधानावर संभाजीराजेंचं स्पष्टीकरण

'...तर मी सहन करु शकणार नाही'; मराठा क्रांती मोर्चाच्या विधानावर संभाजीराजेंचं स्पष्टीकरण

googlenewsNext

मुंबई- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अन्य महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (२७ ऑगस्ट) आयोजित करण्यात आलेल्या मराठा आरक्षणाविषयक बैठकीत मराठा नेत्यांमधील मतभेद समोर आले. या बैठकीत आम्हाला बोलूच दिले नसल्याचा आरोप काही मराठा नेत्यांनी केला. तर छत्रपती संभाजीराजेंचं नेतृत्वच मान्य नसल्याची भूमिका मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी घेतली. मात्र माझे प्रामाणिक कार्य पाहून कित्येक संघटनांनी, लोकांनी अनेकवेळा माझ्याकडे नेतृत्व दिले, पण कधीही मी स्वतःहून हे नेतृत्व स्वीकारले नाही, असं संभाजीराजे यांनी स्पष्ट केलं आहे. 

संभाजीराजे यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. त्याद्वारे त्यांनी आपलं मत स्पष्ट केलं आहे. मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर समाजाचे नुकसान होऊ नये, यासाठी आम्ही सरकारकडे काही मागण्या केल्या होत्या व त्याकरिता आझाद मैदान येथे मी आमरण उपोषणही केले होते. तत्कालीन नामदार एकनाथ शिंदे यांनी उपोषणस्थळी येऊन जी आश्वासने दिली होती, ती आता मुख्यमंत्री म्हणून नैतिक जबाबदारीने पूर्ण करावीत, असे निवेदन मी त्यांना दिले होते. नियुक्त्यांचा विषय मार्गी लागला, हे त्या उपोषणाचेच यश आहे. समाजाच्या याच मागण्यांकरिता त्यांनी बैठक बोलाविली होती. या बैठकीत सारथी संस्थेची स्वायत्तता, समाजासाठी अनेक योजना असे विषय मार्गी लागले. मात्र या बैठकीत काही लोकांनी शिष्टाचार पाळला नाही.

मुद्द्यांवर बोलण्यापेक्षा काही जणांनी भर बैठकीत एकमेकांवरच पातळी सोडून वैयक्तिक टिप्पणी केल्याने मी शांततेचे आवाहन केले. मात्र हा प्रकार वारंवार होत राहिल्याने समाजाच्या मुद्द्यांवर बोलण्यापेक्षा तुमचं हेच चालू राहणार असेल, तर अशा पातळीहीन बैठकीत बसण्यापेक्षा मीच बाहेर जातो, तुमचं चालुद्या ; अशी भूमिका मला घ्यावी लागली. मी कधीही कुणाचा आवाज दाबणे शक्य नाही, पण समाजाच्या नावाने उभे राहत असताना पातळीहीन वागून कुणी समाजाची नाचक्की करणार असेल, तर ते देखील मी सहन करू शकत नाही, असं संभाजीराजेंनी सांगितलं. 

मराठा आरक्षणाच्या लढ्यात मी काही आज आलेलो नाही. २००७ पासून मी या चळवळीत पूर्णतः सक्रिय आहे. माझा राजवाडा, घरदार सोडून, वैभवसंपन्न जीवनशैली सोडून मी महिनो महिने समाजासाठी राज्यभर फिरत असतो. संसदेत सुद्धा मराठा आरक्षणावर बोलणारा मी पहिला आणि कित्येक वर्षे एकमेव खासदार होतो. संसदेच्या प्रांगणात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारा मी एकमेव व्यक्ती आहे. २०१७ साली मुंबई येथे मोर्चाचा स्टेजवर जाऊन समाजाला दिशा दिली, यामुळे आपले मोठे राजकीय नुकसान होणार याची कल्पना असूनही स्वतःपेक्षा समाजाचा विचार केला. आरक्षण रद्द झाल्यानंतर कित्येकांनी समाजाला हिंसक मार्गाला घेऊन जाऊन राजकीय स्वार्थ साधण्याची रणनीती आखली होती. मात्र तेव्हा समाजाला वस्तुस्थिती दाखवून सनदशीर मार्गाने हा लढा पुढे नेला. समाजानेही नेहमीच मला प्रेम दिले, पाठबळ दिले, असं संभाजीराजेंनी म्हटलं. 

फेसबुकवर लिहिणारे आणि मीडियावर बोलणारे राजकीय नेत्यांच्या दावणीला बांधलेले काल आलेले मूठभर लोक म्हणजे समाज नव्हे. शेतशिवारात राबणारा शेतकरी, विविध क्षेत्रांत मेहनतीने काम करणारा कष्टकरी, देशाच्या उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न पाहणारा विद्यार्थी आणि या सर्वांचे पालनपोषण करणाऱ्या माझ्या माता भगिनी म्हणजे माझा मराठा समाज आहे. पंधरा वर्षे मी त्यांच्यासोबत राहून, तळागाळात काम करून, समाजासाठी लढा देऊन, स्वतःच्या राजकीय भवितव्यापेक्षा नेहमीच समाजाच्या भल्याचा प्रथम विचार करून त्यांचा विश्वास, प्रेम आणि पाठबळ कमावले आहे, ते कुठल्या स्वयंघोषित नेत्यांमुळे कमी होणार नाही, असंही संभाजीराजेंनी फेसबुकद्वारे सांगितलं. 

Web Title: Chhatrapati Sambhaji Raje has clarified his stance on Maratha reservation through a Facebook post.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.