मुंबई- समोर औरंगजेब आहे, म्हणूनच शिवाजी महाराज आहेत ना, अफजल खान आहे, म्हणून शिवाजी महाराज आहेत ना, शाहिस्तेखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना अशाप्रकारे विधान करून राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड हे वादात अडकले आहेत. मात्र माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी आवाज बहुजनांचा सन्मान महाराष्ट्राचा असा हॅशटॅग देत चार ओळींचे एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी प्रभु राम, रावण, छत्रपती शिवाजी महाराज, मुघल, आदिलशाही अशा सर्वांचा उल्लेख केला आहे. रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा. दुर्योधन, कर्ण काढून महाभारतातून कृष्ण-अर्जुन समजावून सांगा. आदिलशाही आणि मुघल बाजूला काढून श्री शिवाजी छत्रपतींचा इतिहास समजावून सांगा. इंग्रजांना बाजुला काढून भारतीय स्वातंत्र्यलढा समजावून सांगा, असं विधान जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं.
जितेंद्र आव्हाडांच्या या विधानावर छत्रपती संभाजीराजे यांनी निशाणा साधला आहे. जितेंद्र आव्हाड एका विशिष्ट कंपूत वाढलेले आहेत. महाराष्ट्र त्यांना गांभीर्याने घेत नाही आणि घेणारही नाही. मतांसाठी, चर्चेत राहण्यासाठी बेताल वक्तव्य करणे बरे नव्हे. याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही संभाजीराजेंनी दिला आहे.
दरम्यान, मी जे बोललो त्याचे संदर्भासहित हे स्पष्टीकरण आहे. बहुजनांना बदनाम करण्याची जुनीच पद्धत आहे. जे सत्य आहे ते लोकांसमोर मांडले. तुम्ही बदनामी करा बहुजन महापुरुषांची, आम्ही देऊ उत्तर. बहुजन इतिहास का डोळ्यात सलतो...करारा जवाब मिलेगा असे म्हणत आव्हाड यांनी व्हिडिओ शेअर करत मी माझ्या विधानावर ठाम आहे असल्याचं स्पष्ट केले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"