'...तर उठाव होणारच'; शिंदे-फडणवीस सरकारविरोधात संभाजीराजे आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2022 10:49 AM2022-11-27T10:49:29+5:302022-11-27T10:51:59+5:30
राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर कारवाई न केल्याने छत्रपती संभाजीराजे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.
मुंबई- महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एक आक्षेपार्ह विधान केलं होतं. या विधानाचा राज्यभरातून निषेध करण्यात आला होता. तसेच छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती उदयनराजे यांनी राज्यपालांना महाराष्ट्रातून आणि भाजपातून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती. मात्र राज्यपालांवर अजूनही कोणतीच कारवाई झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे आज पुन्हा संभाजीराजेंनी ट्विट करत इशारा दिला आहे.
भगतसिंग कोश्यारी यांच्यावर अजूनही कोणती कारवाई झालेली नाही. कारवाई होत नाही याचा अर्थ त्यांनी केलेल्या विधानांशी राज्यकर्ते सहमत आहेत का?, असा सवाल संभाजीराजेंनी उपस्थित केला आहे. तसेच महाराष्ट्राच्या जनतेला कुणीही गृहीत धरू नये. शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच, असा इशाराही संभाजीराजेंनी दिला आहे.
भगतसिंग कोश्यारी यांच्यावर अजूनही कोणती कारवाई झालेली नाही. कारवाई होत नाही याचा अर्थ त्यांनी केलेल्या विधानांशी राज्यकर्ते सहमत आहेत का ? महाराष्ट्राच्या जनतेला कुणीही गृहीत धरू नये. शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच !#कोश्यारी_हटाओ
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) November 27, 2022
सदर प्रकरणावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, 'जोपर्यंत चंद्र-सूर्य-तारे आहेत, तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आमचे आणि देशाचे आदर्श असणार आहेत. आजच्या भाषेत सांगायचे झाले, तर छत्रपती शिवाजी महाराज, हेच आमचे हिरो आहेत. कोणाच्याही मनात याबद्दल शंका नाही, राज्यपालांच्या मनातही याबद्दल शंका नसावी.'
...तर त्यांची जीभ कशी हासडायची ते आम्ही बघतो- खासदार उदयनराजे
भगतसिंग कोश्यारी यांना आता विस्मरण झालं असून त्यांची रवानगी वृद्धाश्रमात केली पाहिजे. भगतसिंग कोश्यारींवर कारवाई केली नाही, तर मी माझ्या पद्धतीने योग्य वेळ आल्यावर जाहीर करेन, असा इशारा उदयनराजे यांनी दिला. राज्यातील प्रत्येक पक्ष छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतल्याशिवाय समाजकार्यासह राजकीय वाटचालीला सुरुवात करत नाही. देशाला एकत्रित ठेवायचे असेल, तर छत्रपतींचे विचार जपावे लागतील; अन्यथा भविष्यात देशाचे तुकडे होतील. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्याला हटविणे, सरकारला जमत नसेल, तर त्यांची जीभ कशी हासडायची ते आम्ही बघतो, असं म्हणत राज्यपाल आणि सुधांशू त्रिवेदी यांना इशारा दिला आहे.
काय म्हणाले होते भगतसिंह कोश्यारी?
'आमच्या शालेय जीवनात तुमचा आवडता हिरो कोण? आदर्श कोण ? असे विचारले तर कोणी सुभाष चंद्र बोस, कोणी नेहरू असे सांगत. पण आता जर विचारले तुमचा हिरो कोण? आदर्श कोण ? तर कोठे बाहेर जाण्याची गरज नाही. येथे महाराष्ट्रातच तुम्हाला हिरो मिळतील. शिवाजी महाराज तर जुन्या युगाचे झाले, डॉ. आंबडेकर ते गडकरी हे आजच्या युगाचे आदर्श आहेत,' असे मत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"