मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. २६/११च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यास १० वर्षे होत असताना, या ठिकाणी केलेल्या पाहणीत विमानतळाच्या सुरक्षेसोबत कोणतीही तडजोड केली नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.विमानतळाला धोका असल्याची शक्यता लक्षात घेता, येथे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या (सीआयएसएफ) जवानांचा सतत खडा पहारा असतो. विलेपार्ले येथील टर्मिनल १च्या इमारतीमधील सीआयएसएफच्या मुख्यालयातून विमानतळ सुरक्षेचा आढावा घेतला जातो. अत्याधुनिक यंत्रणा, प्रशिक्षित जवान, अधिकाऱ्यांची चार हजारांची फौज सज्ज आहे.मुंबई विमानतळावरून सुमारे एक लाख चाळीस हजार प्रवासी रोज प्रवास करतात. त्यांच्या सुरक्षेसाठी सीआयएसएफने विमानतळ परिसरातील महत्त्वाच्या इमारतींनाही सुरक्षा पुरविली आहे. हवाई वाहतूक नियंत्रण कक्ष, टर्मिनल १, टर्मिनल २, कार्गो संकुल अशा सर्व महत्त्वाच्या ठिकाणीही कडेकोट सुरक्षा व्यवस्था आहे. योग्य दस्तावेज असल्याशिवाय कुणीही येथे पोहोचू शकणार नाही, याची काळजी घेतली जाते.मध्यंतरी मुंबई विमानतळावरील विमानांना इंधन पुरविणाºया इंधन तळाच्या सुरक्षेबाबत हलगर्जीपणा झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर, येथेही बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. वाहन पार्किंग विभागाशिवाय इतर ठिकाणी वाहन थांबविण्यास सक्त मनाई आहे.सीआयएसएफ सज्जसीआयएसएफचे उपमहानिरीक्षक व मुंबई विमानतळाचे मुख्य विमानतळ सुरक्षा अधिकारी के. एन. त्रिपाठी यांनी सांगितले की, सीआयएसएफचे अधिकारी व जवान दक्ष असून, येथील प्रत्येक हालचालीवर आमचे बारकाईने लक्ष असते. विमानतळावरील सुरक्षा यंत्रणेचा नियमित आढावा घेतला जातो. क्षुल्लक बाबींकडेही दुर्लक्ष केले जात नाही. कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्यासाठी सीआयएसएफ सज्ज आहे. प्रवाशांनी घाबरण्याची काहीच गरज नाही.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर चोख सुरक्षा व्यवस्था!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 3:14 AM