Join us

छत्रपती शिवाजी महाराज द्रष्टे महानायक: राज्यपाल; विशेष टपाल तिकीट प्रकाशन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2023 5:42 AM

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त राज्यपालांच्या हस्ते एका विशेष टपाल तिकीटाचे प्रकाशन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : लोककल्याणकारी राजे छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण भारताचे महानायक होते. परकीय शक्तींकडून असलेले धोके ओळखून त्यांनी सुरतेवर आक्रमण केले. शिवाजी महाराज आणखी २० वर्षे जगले असते तर भारताचा इतिहास पूर्ण वेगळा राहिला असता, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी मंगळवारी केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त राज्यपालांच्या हस्ते राजभवन मुंबई येथे एका विशेष टपाल तिकीटाचे प्रकाशन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, मुंबईच्या पोस्ट मास्टर जनरल स्वाती पांडे तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. 

शिवाजी महाराजांनी आपले आरमार उभारले व अभेद्य किल्ले निर्माण केले. या गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्याची योजना राज्य सरकारने तयार केल्याबद्दल राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले. शिवाजी महाराजांच्या जीवन कार्याचे स्मरण करताना सरखेल कान्होजी आंग्रे तसेच बाजीराव पेशवे यांच्या कार्याचे स्मरण ठेवणे देखील औचित्यपूर्ण ठरेल असे राज्यपालांनी सांगितले. सन १९६० साली राज्यनिर्मितीच्या वेळी शासनाने सुवर्ण व रौप्य मुद्रा काढल्या होत्या, त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्यारोहण वर्षानिमित्त देखील मुद्रा काढण्याबाबत विचार करावा, असे राज्यपालांनी सूचित केले.

‘शिवसृष्टीसाठी ५० कोटी देण्याचा निर्णय’

शिवाजी महाराजांचे कार्य भावी पिढ्यांसमोर आणण्याच्या दृष्टीने प्रतापगडासह इतर गडकिल्ल्यांच्या संवर्धनाला प्राधान्य देण्याचे शासनाने ठरवले असल्याचे सांगून शिवसृष्टीसाठी ५० कोटी रुपये देण्याचा शासनाने निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

शिवाजी महाराज युगपुरुष

शिवाजी महाराज युगपुरुष होते असे सांगून महाराजांनी प्रभू रामाप्रमाणे सामान्य माणसांकडून असामान्य काम करून घेतले, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

टॅग्स :रमेश बैसएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसछत्रपती शिवाजी महाराजशिवराज्याभिषेक