राज ठाकरेंच्या सूचनेनुसार दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कचं रुपडं पालटणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 03:29 PM2023-10-31T15:29:49+5:302023-10-31T15:30:18+5:30
महापालिकेच्या माध्यमातून या मैदानाचं सुशोभिकरण आणि परिसरातील प्रदूषण कसं कमी होईल हे काम हाती घेण्यात येईल.
मुंबई – शहरातील दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानाचं आता रुपडं पालटणार आहे. याठिकाणी विकास आराखड्यानुसार काय काय सुविधा हव्यात यासाठी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी महापालिका अधिकारी आणि खासदार, स्थानिक मनसे नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत राज ठाकरेंनी काही सूचना मांडल्या. त्या सूचनेनुसार आगामी काळात महापालिका काम करेल असा विश्वास खासदार राहुल शेवाळेंनी व्यक्त केला.
याबाबत खासदार राहुल शेवाळे म्हणाले की, शिवाजी पार्कच्या सुशोभीकरणासाठी आज बैठक पार पडली. त्यात काही प्लॅन बनवले आहेत आणि राज ठाकरेंच्या सूचना आहेत. त्यानुसार महापालिकेच्या माध्यमातून या मैदानाचं सुशोभिकरण आणि परिसरातील प्रदूषण कसं कमी होईल हे काम हाती घेण्यात येईल. एक मोठा राष्ट्रध्वज याठिकाणी बसवण्यात येईल. आता ज्या उपाययोजना करण्यात येतील त्या कायमस्वरुपी व्हाव्यात अशा सूचना राज ठाकरेंनी दिली. त्याप्रमाणे कायमस्वरुपी उपाययोजना केल्या जातील. याआधी अनेकदा प्रकल्प हाती घेतले परंतु त्यातून सकारात्मक निष्पन्न झाले नाही त्यामुळे आता ही कामे लवकरच सुरू केली जातील असं त्यांनी सांगितले.
तसेच महाविकास आघाडीवेळी भ्रष्टाचार झाला होता. त्यावेळी मनसे नेते संदीप देशपांडे वारंवार हे निदर्शनास आणून देत होते. लाल मातीची जी भरणी केली आहे त्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो. पण त्यावेळी दखल घेतली नाही. आज त्याच तक्रारीवरून कारवाई लागते. त्यावेळी दखल घेतली असती तर आज धुळीकरणामुळे प्रदूषण होण्याची वेळ आली नसती. परंतु आता राज ठाकरेंच्या सूचनेनुसार, या परिसरातील सुशोभिकरणाचे काम हाती घेतोय असं खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटलं.
दरम्यान, महापालिका अधिकारी आता सकारात्मक आहे. माती टाकली तर धूळ उडेल असं आम्ही मागील वेळी म्हटलं होतं पण बालहट्टापुढे काही चालले नाही. आता त्याचे परिणाम सगळे भोगतायेत आणि हे लोकं तोंड लपवून फिरतायेत. आता राज ठाकरेंनी काही सूचना दिल्यात. त्यानुसार आता यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याचा प्रयत्न आम्ही सगळे मिळून करतोय असं विधान माजी नगरसेवक आणि मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केले आहे.