सदोष वेल्डिंग, कमकुवत ढाचामुळे कोसळला पुतळा; चौकशी समितीच्या अहवालात निष्कर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 05:56 AM2024-09-27T05:56:29+5:302024-09-27T05:57:07+5:30
शिवछत्रपतींचा पुतळा गंजला होता, सुसाट वाऱ्याने उखडले गेले जोड
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकोट (जि. सिंधुदुर्ग) येथील पुतळा कोसळल्यामागची कारणे शोधण्यासाठी नेमलेल्या समितीने पुतळा उभारणीतील अनेक त्रुटींवर बोट ठेवले आहे. या पुतळ्याचा ढाचा कमकुवत होता, वेल्डिंगही दोषपूर्ण होते आणि पुतळा गंजलेला होता, असे समितीच्या अहवालात म्हटले आहे.
पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ४ डिसेंबर २०२३ रोजी झाले होते. पुतळा २६ ऑगस्ट २०२४ रोजी कोसळल्यानंतर खळबळ उडाली. पुतळ्याच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित झाले होते आणि सरकारवर टीकेची झोड उठली होती. त्यानंतर नौसेनेचे कमोडोर पवन धिंग्रा यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारने एक चौकशी समिती नेमली.
समितीने १६ पानांचा अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे. त्यात पुतळा कोसळण्याची कारणे नमूद करण्यात आली आहेत. सूत्रांनी सांगितले, की पुतळा उभारताना जो तळ तयार करण्यात आला होता तो इतक्या भव्य पुतळ्यासाठी पुरेसा मजबूत नव्हता. समुद्राच्या जवळ उभारलेला हा पुतळा भरीव असावयास हवा होता पण तो भरीव नव्हता, पोकळ असल्याने त्यात सुसाट्याचा वारा आल्यानंतर मोठ्या प्रमाणात हवा गेली आणि पुतळ्याला जिथे जिथे वेल्डिंग केलेले होते ते उखडले गेले आणि २८ फुटांचा हा पुतळा कोसळला, असेही अहवालात म्हटले आहे.
पुतळा कोसळल्यानंतर शिल्पकारासह दोघे अटकेत
या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे हा दुर्घटनेनंतर फरारी होता, नंतर त्याला अटक करण्यात आली होती. स्ट्रक्चरल कन्स्लटंट चेतन पाटीललाही अटक करण्यात आली होती.
आता राजगडमध्ये त्याच जागी २० कोटी रुपये खर्च करून छत्रपती शिवाजी महाराज यांचा ६० फुटांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. त्याची निविदा काढण्यात आली आहे.
भौगोलिक परिस्थितीचे भान नाही : ज्या भौगोलिक परिस्थितीमध्ये हा पुतळा उभारला जाणार आहे तिथे पुतळ्यासाठी कसे आणि किती मजबूत बांधकाम असायला हवे याचे योग्य भान ठेवले गेले नाही, अशा शब्दात अहवालात नाराजी व्यक्त करण्यात आल्याची माहितीही सूत्रांनी दिली.
जयदीप आपटेचे पाय खोलात
पुतळ्याचे बांधकाम करताना निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले होते, असा अभिप्राय समितीने दिला आहे. त्यामुळे शिल्पकार आपटे याचे पाय खोलात गेले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता आहे.
समितीत काेण?
या समितीमध्ये सार्वजिनक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी, आयआयटी मुंबईचे प्राध्यापक, केंद्रीय सार्वजिनक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश होता.