Join us

'छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला'; प्रसाद लाड यांचे वक्तव्य, राष्ट्रवादीकडून व्हिडिओ ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2022 11:26 AM

गेल्या काही दिवसापूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरुन राज्यभरात आरोप-प्रत्यारोप सुरू होते.

मुंबई- गेल्या काही दिवसापूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरुन राज्यभरात आरोप-प्रत्यारोप सुरू होते. भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही या विधानाचा निषेध करत कारवाईची मागणी केली होती. आता भाजप आमदार प्रसाद लाड यांनीही कोकण महोत्सवामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात अजब वक्तव्य केल्याचे समोर आले आहे. यावरुन राष्ट्रवादीकडून टीका करण्यात आली आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला, असं वक्तव्य भाजप आमदार प्रसाद लाड यांनी काल मुंबईतील कोकण महोत्समध्ये बोलताना केले. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राष्ट्रवादीकडून व्हिडिओ ट्विट करुन टीका केली आहे.  

काल मुंबईतील कोकण महोत्सावात बोलताना आमदार प्रसाद लाड यांनी हे विधान केले. 'स्वराज्यभूमी कोकण महोत्सव कशासाठी हे तुम्ही विचाराल, हिंदवी स्वराज्याची स्थापन छत्रपती शिवाजी महाराज यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म हा कोकणात झाला. यानंतर रायगडावर त्यांचे बालपण गेले, त्यांची सुरूवात कोकणात झाली, असं आमदार प्रसाद लाड बोलत असल्याचे दिसत आहे. या वक्तव्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे.   

 राष्ट्रवादी काँग्रेसकडून ट्विट करुन टीका केली आहे. 'भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे असे विधान केले. दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या.' असं ट्विटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे. 

टॅग्स :प्रसाद लाडभाजपाराष्ट्रवादी काँग्रेसमुंबई