प्रविण मरगळे
मुंबई – सोशल मीडियात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआवर कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. अग्रिमा जोशुआने विनोदाच्या शैलीतून छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने सोशल मीडियात संताप व्यक्त करण्यात आला होता, अनेकांनी तिच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.
याबाबत लोकमत ऑनलाईनच्या बातमीची दखल घेत गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी राज्य सरकार कधीच खपवून घेणार नाही. या स्टँडअप कॉमेडियच्या व्हिडीओची तपासणी करण्याचे आदेश मुंबई पोलीस आयुक्तांना देण्यात येतील. या व्हिडीओमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील आणि काही आक्षेपार्ह असेल तर तात्काळ त्यावर कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही शंभुराज देसाई यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे.
मुंबईत अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या स्मारकाबद्दल अग्रिमा जोशुआने विनोदातून टीका केली. ही टीका करताना तिने शिवाजी महाराजांच्या एकेरी उल्लेख केला तसेच त्यांच्याबद्दल अपमानास्पद शब्द वापरले. अग्रिमा म्हणाली की, “शिवाजी या पुतळ्याबाबत अधिक माहिती जाणण्यासाठी मी इंटरनेटच्या सोर्सवर गेली तर त्याठिकाणी सगळं कोरं होतं. कोणीतरी निबंध लिहिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते शिवाजी पुतळ्याचा मास्टरस्ट्रोक आहे जेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात सत्ता येईल, दुसऱ्या एकाला वाटलं काहीतरी क्रिएटिव्हिटी कॉंन्सेंट आहे, तो म्हणाला, या जीपीएस ट्रेकरसुद्धा असणार आहे शिवाय त्यांच्या डोळ्यात लेझर लाईट निघेल जी अरबी समुद्रातून येणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांवर नजर ठेवेल. तर तिसरा व्यक्ती येऊन सांगतो, शिवाजी नाही तर शिवाजी महाराज म्हणा, बस्स मी त्यालाच फॉलो केलं” अशा शब्दात अग्रिमाने विनोद केल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.
स्टँडअप कॉमेडियनने केली छत्रपती शिवाजी महाराजांची थट्टा; सोशल मीडियात संतापाची लाट
ट्विटरवर याबाबत नाराजी पसरली असून महाराष्ट्र सरकार आणि पोलिसांनी या स्टँड-अप कॉमेडियनवर कठोर कारवाई करावी अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरु अशा तीव्र भावना व्यक्त करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत असून त्यांच्याबद्दल अशी थट्टा अजिबात सहन केली जाणार नाही. या शिवाजी महाराजांनी सर्व जातींना एकत्र करत स्वराज्य निर्माण केले. त्यांच्यावर असा विनोद करणे संतापजनक आहे अशा भावना ट्विटरवर युजर्सने मांडल्या आहेत. याबाबत ट्विटरवर शिवाजी महाराज असा हँशटॅग ट्रेंड होत आहे.