चीनचे वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र समोर आला- फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 07:32 PM2023-11-09T19:32:01+5:302023-11-09T19:44:52+5:30
मेरी माटी, मेरा देश’ अभियानांतर्गत ‘सेल्फी विथ मेरी माटी’चे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्र महाराष्ट्राला प्रदान
मुंबई: केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात आलेल्या मेरी माटी मेरा देश या अभियान अंतर्गत सेल्फी विथ मेरी माटी या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने राबवलेल्या उपक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद करण्यात आली आहे. आज मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'चे प्रमाणपत्र प्रदान सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल रमेश बैस हेदेखील उपस्थित होते.
भारत हा केवळ भूभाग नसून आपण आपल्या देशाला मातेचे स्थान दिले आहे. ज्याप्रमाणे मातेचे उत्तरदायी होता येत नाही, तसे मातीचे सुद्धा उत्तरदायी होता येत नाही आणि ऋण ही फेडता येत नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच देशभरात आपल्या मातीबद्दल देशभावनेचे अभियान राबविण्यात आले आणि चीनचे वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचामहाराष्ट्र समोर आला असल्याची भावना देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली.
विक्रम वीरांची परंपरा महाराष्ट्राला आणि इथल्या मातीला लाभली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून मेरी माटी मेरा देश अभियान देशभरात राबविण्यात आले आहे. याचाच भाग म्हणून सेल्फी विथ मेरी माटी अभियानाचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणे ही दिवाळीच्या मुहूर्तावर महाराष्ट्राला मिळालेली अभूतपूर्व भेट असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. देशभावनेचे अभियान यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र सुरुवातीपासून आघाडीवर होता. देश प्रेमाच्या या भावनेतून हा उपक्रम यशस्वी करून वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठी सर्वांनी योगदान दिले याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताला 'जी २०' चे अध्यक्षपद भूषविण्याचा मान मिळाला, ही अभिमानाची बाब असल्याचे मत एकनाथ शिंदेंनी यावेळी व्यक्त केले.
#LIVE | 'मेरी माटी मेरा देश' गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्र प्रदान सोहळ्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 9, 2023
https://t.co/GUnR36yiKK
अभियानात सहभागीय विद्यार्थ्यांचे अभिनंदन- चंद्रकांत पाटील
२५ लाख विद्यार्थ्यांनी ‘सेल्फी विथ मेरी माटी’ या उपक्रमात सहभाग घेतला. हे देशभक्तीचे उत्तम उदाहरण असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले. गेल्या एक ते दीड महिन्यापासून राज्यातील सर्व विद्यापीठे महाविद्यालये, उच्च शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक व इतर सर्व संबंधितांनी ‘सेल्फी विथ मेरी माटी’ अभियान यशस्वीपणे राबवून विश्वविक्रम केला आहे, ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.