मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज बहुउददेशीय केंद्राचा लोकार्पण सोहळा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पार पडला. या सोहळ्यात सर्वसामान्य जनतेसाठी अद्ययावत शौचालयही खुले करण्यात आले आहे. मात्र, या शौचालयास छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिल्याचा आरोप करत मनसेनं भाजपावर जोरदार टीका केली आहे. मनसेच्या टीकेनंतर आमदार प्रसाद लाड यांनी आपलं ट्विट डिलीट केलंय. पण, बहुउद्देशीय केंद्राला शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले असून शौचालयास दिले नसल्याचे भाजपा समर्थकांनी स्पष्ट केलंय.
विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी आपल्या मतदारसंघात सुरू केलेल्या शौचालयाचं उद्घाटन भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते केलं. या सोहळ्याला आमदार आशिष शेलार, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, कॅप्टन तमिल सेलवन, आमदार कालिदास कोळमकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होते. त्यानंतर, 4 मार्च रोजी रात्री 10 वाजून 11 मिनिटांनी त्यांनी एक ट्विट केलं होतं. त्यामध्ये एका उद्घाटन सोहळ्याची माहिती त्यांनी दिली होती. आपल्या मतदारसंघात एक बहुउद्देशीय केंद्र आणि अद्ययावत शौचालयाचे उद्घाटन केल्याचे त्यांनी म्हटले होते. मात्र या शौचालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिल्याचा आरोप करत मनसेने भाजपावर टीका केली आहे.
प्रसाद लाड यांच्या मतदारसंघात सुरू केलेल्या बहुउद्देशीय केंद्राला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले आहे. मात्र, शौचालयास कुठेही शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आल्याचे दिसत नाही. तरीही, मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी प्रसाद लाड यांच्या ट्विटला आक्षेप घेत ''ही लोक डोक्यावर पडली आहेत का ?छत्रपती शिवाजी महाराजांच नाव शौचालयाला???'' असे म्हटले आहे. देशपांडे यांच्या ट्विटनंतर प्रसाद लाड यांनी आपलं ट्विट डिलिट केलं आहे. मात्र, जर, शौचालयास छत्रपती शिवाजी महाराजांचं नावच दिलं नाही, तर लाड यांनी ट्विट डिलिट का केलं, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, देशपांडे यांच्या ट्विटचा अनेक भाजपा समर्थकांनी समाचार घेत, राजकारण करा पण डोळस करा, असा सल्लाही त्यांना दिलाय.