Join us

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे माेदींच्या हस्ते होणार अनावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 7:58 AM

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे बुधवारी बैठक पार पडली

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भारतीय नौसेनेच्यावतीने यावर्षीचा नौसेना दिवस (४ डिसेंबर) सिंधुदुर्ग किल्ला येथे साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने मालवण-राजकोट येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. या दोन्ही कार्यक्रमांच्या तयारीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी आढावा घेतला. 

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे बुधवारी बैठक पार पडली. या बैठकीस शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौसेना दिवस हा सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. नौसेना दलाने विविध जलदुर्गांच्या पाहणीअंती सिंधुदुर्ग किल्ला आणि परिसराची निवड केली आहे. 

देश-विदेशातून अनेकांची उपस्थिती सिंधुदुर्गच्या समुद्र किनारी राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा ४३ फूट उंच पुतळा उभारण्यात आला आहे. तसेच आर्ट गॅलरीही साकारण्यात आली आहे. नौसेना दिवस कार्यक्रमात नौसेनेच्या विविध युद्धनौका, लढाऊ विमाने सहभागी होणार आहेत. तारकर्ली आणि मालवण समुद्र किनारी यानिमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. देश-विदेशातील मान्यवर विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

    बैठकीत नौसेना अधिकाऱ्यांनी नियोजित विविध कार्यक्रम, त्यांची रूपरेषा सांगितली.     या नौसेना दिवस कार्यक्रमासाठी सरखेल कान्होजी आंग्रे  तसेच हिरोजी इंदुलकर यांचे वंशज यांना निमंत्रित करण्यात आले आहे. 

टॅग्स :मुंबईछत्रपती शिवाजी महाराजसिंधुदुर्ग