Join us

छत्रपतींना ‘शिवस्मारका’आधी पाठ्यपुस्तकांत स्थान द्या!

By admin | Published: March 23, 2017 1:55 AM

राज्य शासनाने अरबी समुद्रातील भव्य शिवस्मारक उभारण्यापूर्वी, छत्रपती शिवाजी महाराजांचा सविस्तर अभ्यासक्रम ‘एनसीईआरटी’च्या

मुंबई : राज्य शासनाने अरबी समुद्रातील भव्य शिवस्मारक उभारण्यापूर्वी, छत्रपती शिवाजी महाराजांचा सविस्तर अभ्यासक्रम ‘एनसीईआरटी’च्या पाठ्यपुस्तकांत समाविष्ट करावा, या मागणीसाठी विविध हिंदुत्ववादी संघटनांनी बुधवारी आझाद मैदानात निदर्शने केली. गोव्यातील राज्य प्रशासनानेही शिवरायांप्रती कृतज्ञता व्यक्त करत, मोगलांचा इतिहास कमी करून, छत्रपती शिवाजी महाराजांचा सविस्तर अभ्यासक्रम समाविष्ट केल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.‘एनसीईआरटी’च्या इयत्ता सातवीच्या इतिहासाच्या पुस्तकातील १५४ पृष्ठांपैकी बहुतांश पृष्ठे हिंदुस्थानावर आक्रमण करणाऱ्या मोगल राजांच्या माहितीसाठी खर्ची घालण्यात आली आहेत, तर छत्रपती शिवरायांचा इतिहास केवळ ६ ओळींत मांडून संपवण्यात आला आहे. पुस्तकात जागा असूनही शिवरायांचे साधे चित्रही छापलेले नाही. ‘एनसीईआरटी’च्या अभ्यासक्रमात २५ टक्के बदल करण्याचा अधिकार राज्य सरकारला असतो. गोव्यात आंदोलन केल्यानंतर, तत्कालीन काँग्रेस सरकारने पूर्ण पाठ्यपुस्तकच बदलले होते. मात्र, केंद्र आणि राज्य शासनाकडे गेली ८ वर्षे पाठपुरावा करूनही, छत्रपतींच्या जन्म आणि कर्म भूमीतच त्यांची उपेक्षा होत आहे, असे मत हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते डॉ. उदय धुरी यांनी व्यक्त केले आहे. निवडणूक काळात जाहीर सभांमध्ये छत्रपतींचा आदर्श सांगणाऱ्या भाजपा-शिवसेना युती शासनाने, शिवरायांच्या पराक्रमी चरित्रांचा समावेश पाठ्यपुस्तकांत करण्याची मागणी संघटनांनी या वेळी केली. आंदोलनात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, श्री शिवकार्य प्रतिष्ठान, शिवशंभो प्रतिष्ठान, स्वराज्य युवा प्रतिष्ठान, रायगड संवर्धन प्रतिष्ठान, भारतीय युवाशक्ती, हिंदू राष्ट्र सेना, श्री योग वेदांत सेवा समिती, श्री बजरंग सेवादल, हिंदू महामंडलम्, हिंदू गोवंश रक्षा समिती, हिंदू राष्ट्र जनजागरण समिती, बजरंग दल, सनातन संस्था, शिवसेना, भारतीय जनता पार्टी, हिंदू जनजागृती समिती या सदस्यांनी सहभाग घेतला होता. (प्रतिनिधी)