मनोज मोघे
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : छत्रपती शिवरायांचे चरित्र हे महाराष्ट्रासह जगभरासाठी प्रेरणादायी आहे. गनिमीकावा या युद्धनीतीने त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांतून घडलेला हा शिवरायांचा इतिहास आता जगातील ३०० भाषांत झळकणार आहे. विकिपीडियाने राज्य सरकारशी यासंदर्भात संपर्क साधला असून सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही त्याला होकार दर्शविल्याने लवकरच जगभरात छत्रपती शिवरायांचे चरित्र प्रकाशित होणार आहे.
सध्या मराठी, हिंदी, इंग्रजी अशा मोजक्या भाषांत छत्रपती शिवरायांविषयीची माहिती विकिपीडियावर उपलब्ध आहे. त्याला अधिक व्यापक रूप देण्यासाठी शिवरायांचे चरित्र जगातील ३०० भाषांत आणण्याची योजना विकिपीडियाने आखली आहे. यासंदर्भातील मानस विकिपीडियाचे जागतिक संचालक होरे वर्गीस यांनी काही दिवसांपूर्वीच उदयपूर येथे सांस्कृतिक कार्यमंत्री मुनगंटीवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीदरम्यान बोलून दाखवला, त्यानंतर या योजनेला आता मूर्तरूप येत आहे.
निधीसाठी नोएल टाटांचे सहकार्य
सीएसआर फंडाच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभरातील इतर भाषांमध्ये आणण्याच्या योजनेसाठी निधी उभारला जाणार असून यासाठी टाटा इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक नोएल टाटा यांच्यासोबतही बोलणी झाली आहेत. शिवरायांचे चरित्र जगभरात पोहोचविण्यासाठी त्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.
महाराजांवर टॉकिंग बुक
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील चरित्रासाठी विकिपीडियाला आवश्यक ती माहिती आम्ही देणार आहोत. छत्रपती शिवरायांचे चरित्र विकिपीडियाच्या माध्यमातून जगभरात पोहाेचविण्याबरोबरच श्रीमद्भगवद्गीतेप्रमाणे महाराजांवर २० भाषांत टॉकिंग ऑडिओ आणि व्हिडीओ बुक तयार करण्याचा विचार आहे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांवर नाणे प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यासंदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेशी बोलणी झालेली आहेत. त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांवर आधारित पोर्टलही येणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.
गडकिल्ल्यांविषयी विशेष कार्यक्रम
महाराष्ट्राला ऐतिहासिक वारसा असून त्यातील गडकिल्ल्यांशी अनेक ऐतिहासिक कथा जोडल्या आहेत. त्या कथांसह या गडकिल्ल्यांची माहिती नवीन पिढीला व्हावी म्हणून विशेष योजना आखण्यात येत असल्याची माहितीही सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.