छत्रपती शिवरायांना मुस्लीम मावळ्याची २९ वर्षांपासून मानवंदना; ‘गेटवे ऑफ इंडिया’ येथे दररोज सूर्यास्तावेळी उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 08:14 AM2024-08-06T08:14:12+5:302024-08-06T08:15:04+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांनी जाती-धर्मापलीकडे जाऊन समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली. साडेतीनशे वर्षे उलटल्यानंतरही मेहबूब यांच्या रूपाने त्याची प्रचीती येते.
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांना गेली २९ वर्षे नित्यनेमाने नौबत वाजवून मानवंदना देण्याचे कार्य एक मुस्लीम मावळा अखंडपणे करीत आहे. ‘गेटवे ऑफ इंडिया’ येथे दररोज सूर्यास्तावेळी महाराजांना मानवंदना देणाऱ्या त्या मावळ्याचे नाव आहे मेहबूब इमामहुसैन मदुनावर.
छत्रपती शिवाजी महाराजांनी जाती-धर्मापलीकडे जाऊन समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली. साडेतीनशे वर्षे उलटल्यानंतरही मेहबूब यांच्या रूपाने त्याची प्रचीती येते.
मेहबूब त्यांचे आई-वडील मूळचे कर्नाटकातील, सौंदतीचे. त्यांचे वडील कामानिमित्त १९५० मध्ये मुंबईत आले. मेहबूब यांचा जन्म मुंबईत कुलाबा येथे झाला. ते ५७ वर्षांचे आहेत. ते म्हणाले, ‘समजायला लागल्यापासून शिवजयंती साजरी करतोय. गेटवे येथे १९८२ पासून ही नौबत वाजवली जाते. बाबूराव दीपक जाधव १९९५पर्यंत नौबत वाजवत. पुढे ते विठ्ठलवाडीला राहायला गेले. त्यामुळे हे काम माझ्याकडे आले.’
कळायला लागले तेव्हापासून शिवजयंतीच्या कार्यक्रमात मी पुढे आहे. त्यातून शिवमुद्रा प्रतिष्ठानने ही जबाबदारी माझ्यावर सोपवली. महाराजांची नौबत वाजवायला मिळणे, हे माझे सौभाग्य आहे. त्यांच्याप्रति असलेली निष्ठा, प्रेम, भक्ती आणि श्रद्धेतूनच मला हे काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे, असे मेहबूब यांनी सांगितले.
मेहबूब दररोज सूर्यास्तावेळी गेटवे ऑफ इंडिया येथे येऊन न चुकता नौबत वाजवून महाराजांना मानवंदना देतात. त्यानंतर नौबत का वाजवली जाते, याची माहिती पर्यटकांना देतात.
चक्रीवादळाने नौबतीचे नुकसान झाले होते तेव्हा स्वतःखिशातून ३५ हजार खर्च करून दुरुस्ती केली. जोपर्यंत माझे हातपाय काम करत आहेत, तोपर्यंत मी ही नौबत वाजवून महाराजांना मानवंदना देत राहीन.
- मेहबूब मदुनावर
मुख्यमंत्र्यांना पत्र
मेहबूब कुलाबा नेव्हीनगर येथील गीतानगरमध्ये १० बाय १०च्या खोलीत कुटुंबासह राहतात. उपजीविकेसाठी थंडपेये, कुल्फी किंवा अन्य वस्तूंची विक्री करतात.
पालिकेकडून दुकानदारांना अन्यत्र स्थलांतरित केले जाणार आहे. त्या ठिकाणी एक जागा द्यावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.