मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील अश्वारूढ स्मारकात मुख्यमंत्र्यांच्या खात्याकडून एक हजार कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे. याबाबत केंद्रीय दक्षता समितीकडे तक्रार करणार असून त्यांनी दखल घेतली नाही तर कोर्टाकडे दाद मागणार आहे असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक आणि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली आहे.
मागच्या आठवड्यात शिवस्मारकाबाबत सरकारने घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्याचा पार्ट - २ येतोय असं सांगितलं होते त्याची आज कागदपत्रे नवाब मलिक आणि काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सादर केली मागच्या आठवड्यात शिवस्मारकाबाबत भ्रष्टाचार उघड करतो असं सांगितल्यावरही मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटील यांनी तो मुद्दा घेतला नाही किंवा सरकारच्या माध्यमातून उत्तरही दिलेले नाही. आम्ही जे मुद्दे उपस्थित केले त्यालाही उत्तर देत नाही. उलट पवारांवर ईडीचा गुन्हा दाखल हा विषय पुढे सोडला आणि शिवस्मारक घोटाळा बाजुला गेला असेही नवाब मलिक म्हणाले.
एल & टी या कंपनीने भरलेल्या ३ हजार ८०० कोटी रूपयांच्या निविदेची रक्कम वाटाघाटीद्वारे २ हजार ५०० कोटीं रूपयांपर्यंत कमी करण्याला विभागीय लेखापरीक्षकांनी आक्षेप नोंदवत चौकशीची मागणी केली होती. यातील गंभीर बाब ही आहे की, या प्रकल्पाची निविदेतील किंमत २ हजार ६९२.५० कोटी होती. पंरतु एल & टी कंपनीची निविदेतील बोली ही ३ हजार ८२६ कोटी म्हणजेच जवळपास ४२ टक्के अधिक होती. त्यामुळे ख-या अर्थाने या प्रकल्पाची फेरनिविदा होणे आवश्यक होते. आराखडा बदलून ही रक्कम अंदाजीत रकमेच्या १ हजार कोटींपेक्षाही कमी झाली आहे. परंतु एल & टी ने आधीच फुगवलेली रक्कम आम्ही वाटाघाटीतून कमी केली आणि शासनाचा फायदा करून दिला असे सरकारकडून भासवले जात आहे. परंतु वस्तुतः यात १ हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम काढण्याचा सरकारचा हा डिझाईन करुन भ्रष्टाचार करण्याचा डाव होता असा आरोपही नवाब मलिक यांनी केला.
स्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी भ्रष्टाचार झाल्याचे पत्र दिले आहे. शिवाय कॅगचे अधिकारी सांगत आहेत. मुख्यमंत्री याच्या खात्यात भ्रष्टाचार झाला आहे. मात्र यामध्ये इतर पक्षांसह शिवसेनाही गप्प आहे. शिवस्मारकाच्या कामात १ हजार कोटींचा भ्रष्टाचार करण्याचे सरकारचे कारस्थान आहे. महाराष्ट्राच्या ५९ वर्षांच्या राजकीय परंपरेला कलंकीत करणारे हे कृत्य असून राज्यातील शिवप्रेमी जनता भाजप शिवसेना सरकाला कदापी माफ करणार नाही, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली.