Join us

छत्रपती जसे तुमचे आदर्श तसे आमचेही; झेंड्यावरुन वाद निर्माण करणाऱ्यांना मनसेची चपराक 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 8:14 AM

गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये महाअधिवेशन होणार असून यासाठी राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत.

ठळक मुद्देविचार महाराष्ट्र धर्माचा, निर्धार हिंदवी स्वराज्याचा ही आमची टॅगलाइन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते महाअधिवेशनाचं उद्धाटन होईलसंध्याकाळी ५ ते ६ च्या सुमारास राज ठाकरे उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलं महाअधिवेशन आज मुंबईत पार पडत आहे. यावेळी पक्षाचे धोरण तसेच झेंड्यातही बदल होणार असल्याचं सांगण्यात आलं. मनसेचा नवीन भगव्या झेंड्यावर असणाऱ्या राजमुद्रेचा वापरावरुन वाद निर्माण झाला असताना मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी चपराक दिली आहे. 

याबद्दल बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले की, विचार महाराष्ट्र धर्माचा, निर्धार हिंदवी स्वराज्याचा ही आमची टॅगलाइन आहे त्यातून सगळं स्पष्ट आहे. काही लोकांनी राजमुद्रेवरुन वाद निर्माण केला असेल त्यांना विनंती आहे की, छत्रपतींना जसं तुम्ही आदर्श मानता तसं आम्हीदेखील शिवरायांना आदर्श मानणारे आहोत. शिवरायांनी जसं लोककल्याणकारी राज्य निर्माण केले तोच विचार घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. त्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 

तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतला महाराष्ट्र पुन्हा उभा करण्याचा मानस आहे. देशहितासाठी आणि महाराष्ट्र हितासाठी जे योग्य असेल ते करणार आहोत. अमित ठाकरेंवर पक्षात जबाबदारी दिली तर आनंदच आहे, याचा निर्णय राज ठाकरे घेतील, शेतकरी, महिला, सामाजिक अशा विषयांवरील वेगवेगळे ठराव मांडण्यात येणार आहे असं बाळा नांदगावकर यांनी सांगितले. 

महाअधिवेशनासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना विशेष ओळखपत्र देण्यात आलेलं आहे. त्यावर बारकोड लावण्यात आलंय, ओळखपत्र असलेल्या पदाधिकाऱ्यांनाच महाअधिवेशनाला उपस्थित राहता येणार आहे. मात्र राज ठाकरेंच्या भाषणासाठी सर्वांना महाअधिवेशन खुलं करण्यात येणार आहे. त्यामुळे सामान्य नागरिकही यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचं पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले आहे.  

दरम्यान, गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये महाअधिवेशन होणार असून यासाठी राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. सकाळी ९ वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते महाअधिवेशनाचं उद्धाटन होईल त्यानंतर अधिवेशनाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंच्या हस्ते नवीन झेंड्यांचे अनावरण केले जाईल.यानंतर काही ठराव मांडले जातील यावर विविध नेत्यांची मार्गदर्शक भाषणं होतील. साधारणपणे संध्याकाळी ५ ते ६ च्या सुमारास राज ठाकरे उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. 

टॅग्स :राज ठाकरेबाळा नांदगावकरमनसेछत्रपती शिवाजी महाराज