Join us

Video: 'छत्रपतींचा मावळा मुख्यमंत्री आहे, तर...'; फडणवीसांचं भाषण अन् मुख्यमंत्र्यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 7:11 PM

अहिल्यादेवींची आज सर्वत्र २९८ वी जयंती साजरी केली जात आहे. या निमित्ताने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री नगर येथील चौंडी येथे कार्यक्रमाला, अभिवादन करायला आले होते

मुंबई - अहमदनगर जिल्ह्याचं लवकरच नामांतर होणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे, अशी माहिती शिंदेंनी दिली. ते चौंडी येथे एका सभेला संबोधित करताना ते बोलत होते. त्यामुळे आगामी काळात हा जिल्हा 'अहिल्यानगर' म्हणून ओळखला जाईल, असं शिंदेंनी स्पष्ट केलं. तत्पूर्वी उपमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अहिल्यानगर करावे, अशी मागणी केली होती. त्यानंतर, लगेच मुख्यमंत्र्यांनी ही घोषणाही केली.  

अहिल्यादेवींची आज सर्वत्र २९८ वी जयंती साजरी केली जात आहे. या निमित्ताने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री नगर येथील चौंडी येथे कार्यक्रमाला, अभिवादन करायला आले होते. येथील भाषणात त्यांनी अहमदनगर जिल्ह्याचं नाव 'अहिल्यानगर' करणार असल्याचे जाहीर केले. अहिल्यानगर असं नामांतर करण्याचा निर्णय आमच्या काळात होतोय हे आमचं भाग्य आहे. तसेच हे नामांतर झाल्यामुळे नगर जिल्ह्याचा मान देखील हिमालयाएवढा होणार आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. तत्पूर्वी देवेंद्र फडणवीसांनी भाषण करताना, छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा मुख्यमंत्री आहे, तर अहिल्यानगर होणारच असे म्हटले होते.

या जिल्ह्याला अहिल्यानगर नाव दिलं पाहिजे, अशी सातत्याने मागणी होतेय. आपलं सरकार हिंदुत्त्ववादी सरकार आहे, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगणारे आहोत. तुमच्याच नेतृत्त्वात आपण छत्रपती संभाजीनगर तयार केलंय, आपण धाराशिव तयार केलंय. आता, तुमच्याच नेतृत्त्वात अहिल्यानगर देखील याठिकाणी झालं पाहिजे. मला विश्वास आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा मुख्यमंत्री आहे, तर अहिल्यानगर होणारच... असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी मागणी केली अन् काही वेळातंच मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली. 

अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्याची मागणी सातत्याने केली जात होती. माझे सहकारी राधाकृष्ण विखे पाटील, राम शिंदे, गोपीचंद पडळकर आणि इतरही नेते सातत्याने यासाठी आग्रह करीत होते. आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आयोजित कार्यक्रमात ही मागणी मी सुद्धा भाषणादरम्यान पुन्हा केली आणि त्याला तत्काळ प्रतिसाद देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तशी घोषणा केली, याबद्दल मी त्यांचा अतिशय आभारी आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.  अहमदनगर जिल्हा आता पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणून लवकरच ओळखला जाईल. धर्मरक्षणाचे महान कार्य करणार्‍या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना ही आमच्या शासनाची आदरांजली आहे, असे फडणवीस यांनी व्हिडिओ ट्विट करुन म्हटले आहे. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसएकनाथ शिंदेअहमदनगरमुख्यमंत्री