लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : दोन कोटींच्या खंडणीप्रकरणी छोटा राजनचा साथीदार कुख्यात गँगस्टर एजाज युसूफ लकडावाला (५०, रा. मुंबई) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने सोमवारी रात्री तळोजा कारागृहातून अटक केली. त्याला १२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
एजाज याला मुंबई पोलिसांनी अलीकडेच एका गंभीर गुन्ह्यात अटक केली होती. त्यानेच कल्याणच्या दूधनाका परिसरातील महारुफ खोटाल (५०) या दूधविक्रेत्याला २२ नोव्हेंबर २०१९ ते ३० नोव्हेंबर २०१९ या कालावधीत वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकांवरून फोन करून दोन कोटींच्या खंडणीसाठी धमकावले होते. ‘खैरियत चाहते हो, तो दो खोका भेज दो भाईजान, नही तो ठोक दूंगा,’ असे मेसेजही त्याने केले होते. ही खंडणी दिली नाही, तर त्यांना त्याने ठार मारण्याचीही धमकी दिली होती. या प्रकरणी ३० नोव्हेंबर २०१९ रोजी कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध खंडणी मागणे आणि ठार मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी ठाणे खंडणीविरोधी पथकही समांतर तपास करीत होते. त्याचा यातील सहभाग असल्याची बाब तपासात उघड झाल्याचा अहवाल ठाणे खंडणीविरोधी पथकाने न्यायालयात दिला. त्याच आधारे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा नवी मुंबईतील तळोजा कारागृहातून वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे आणि पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांच्या पथकाने ८ फेब्रुवारी २०२१ रोजी ताबा घेतला. तो छोटा राजन टोळीचा सक्रिय गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध खंडणी, खून, फसवणूक, खुनाचा प्रयत्न असे ३० पेक्षा अधिक गंभीर गुन्हे मुंबईतील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली