मुंबई : मुंबईतील गिरणी कामगार चळवळीचे नेतृत्व करणारे डॉ.दत्ता सामंत यांच्या हत्येप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने शुक्रवारी राजेंद्र सदाशिव निकाळजे ऊर्फ छोटा राजन याची निर्दोष सुटका केली. विशेष न्यायालयाचे न्या.ए.एम. पाटील यांनी सबळ पुराव्यांभावी छोटा राजनची सर्व आरोपांतून सुटका केली. सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, १६ जानेवारी १९९७ रोजी डॉ.सामंत त्यांच्या जीपमध्ये बसून पवईवरून पंतनगरला जात होते. घाटकोपरला पोहोचताच पद्मावती रोडवरील नरेश स्टोअर्सजवळ त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. चार अज्ञात व्यक्ती एका दुचाकीवरून आल्या आणि त्यांनी सामंत यांची जीप अडविली.
त्यानंतर त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार करण्यात आला. त्यांच्यावर १७ बंदुकीच्या गोळ्या झाडल्या. ते रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर चारही व्यक्ती फरार झाल्या. सामंत यांना जवळच्याच अनिकेत नर्सिंग होममध्ये नेण्यात आले. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले, असे सरकारी वकिलांनी सांगितले.
दरम्यान, डॉ.सामंत यांच्या जखमी ड्रायव्हरने तक्रार केल्यानंतर साकिनाक पोलिसांनी गुन्हा दाखल केला. खटल्याच्या पहिल्या टप्प्यात काही आरोपींवर खटला चालविण्यात आला आणि जुलै २००० मध्ये निकाल देण्यात आला. तर, छोटा राजन, गँगस्टर गुरू साटम आणि रोहित वर्माला फरारी आरोपी दाखवून स्वतंत्र खटला सुरू करण्यात आला होता.
२०१५ मध्ये छोटा राजनला बालीला अटक करण्यात आली. तेथून त्याला भारतात आणण्यात आले. त्यानंतर छोटा राजनशी संबंधित सर्व प्रकरणे सीबीआयकडे वर्ग करण्यात आली. त्यात डॉ.दत्ता सामंत यांच्या हत्येच्या प्रकरणाचाही समावेश होता.