मुंबई - कुख्यात गुंड छोटा शकीलचा हस्तक आणि दाऊदचा शार्पशूटर रशीद मलबारीला अबुधाबीत तेथील पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती वरिष्ठ पोलिस सूत्रांनी दिली. मलबारीने २०१४ मध्ये पॅरोलवर बाहेर आल्यावर बांग्लादेशमार्गे पलायन केले होते. मुंबईत अनेक गुन्हे दाखल असल्याने त्याला मुंबई गुन्हे शाखा मुंबईत आणणार असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
अबुधाबीमध्ये मलबारीला बांग्लादेशी पासपोर्टवर पकडण्यात आले आहे. कर्नाटकातील त्याच्या भावाने ही व्यक्ती रशीद मलबारीच असल्याचा दुजोरा केंद्रीय तपास यंत्रणांना दिला आहे. मलबारीच्या अटकेबाबत मुंबई पोलिसांना सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.मात्र, त्याबाबत अद्याप मुंबई पोलिसांनी मलबारीचा ताबा घेण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केलेला नाही. कर्नाटक पोलिसांनी त्याच्याविरोधात लुक आऊट नोटीस जारी केल्यामुळे त्यांना त्याचा ताबा मिळू शकतो, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. मुंबईत मलबारीविरोधात अनेक गुन्हे दाखल असून मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी याबाबत माहिती घेवून योग्य तो निर्णय घेवू असे सांगितले. भारतात, परदेशात छोटा राजन टोळीच्या अनेक गुंडांच्या हत्येत मलबारीचा सहभाग होता. थायलंडमध्ये छोटा राजन आणि इजाझ लकडावालावर झालेल्या गोळीबारातही त्याचा सहभाग होता. त्यांच्या विरोधात कर्नाटक व मुंबईत अनेक गुन्हे दाखल आहेत. २००९ साली वरुण गांधी, प्रमोद मुतालिक यांच्यासह भाजप व श्रीराम सेनेच्या नेत्यांची हत्या करण्याच्या हेतूने आल्याच्या आरोपाअंतर्गत मंगलोर पोलिसांनी मलबारीला अटक केली होती. २०१४ साली मुंबई पोलिसांनी १९९८ मधील शब्बीर पठाण याच्या हत्या प्रकरणात त्याचा ताबा घेतला होता. त्यानंतर त्याला पुन्हा कर्नाटकला पाठवण्यात आले होते. २१ जुलै २०१४ ला बेंगळूरु मध्यवर्ती कारागृहात असताना मलबारीने पत्नीच्या आजारपणाचे कारण सांगत पॅरोल मिळवला होता. त्यानंतर तो पुन्हा परतलाच नाही. न्यायालयाने त्याला फरारी घोषित करून वॉरंट जारी केले होते. नंतर पोलिसांनी लुक आऊट व रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती.