११ रुपयांत चिकन बिर्यानी, १० रुपयांत सूप !
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2021 02:30 AM2021-01-16T02:30:34+5:302021-01-16T02:31:38+5:30
मुख्यमंत्री बंगल्यावर हा दर परवडतो कसा?
यदु जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वर्षा बंगला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा देवगिरी बंगला या ठिकाणी खानपान सेवेचे कंत्राट ज्या दरात देण्यात आले आहे ते दर वाचून राज्यात तुम्हाला धक्काच बसेल. चिकन बिर्यानी केवळ ११ रु., दही मिसळ १० रु.,व्हेज सँडविच १० रु. सुकामेवा १० रुपये आदी दरात हे कंत्राट देण्यात आले आहे.
मुंबईतील बिगर तारांकित, साध्या हॉटेलांमध्ये यापेक्षा सहा ते सात पट जास्त दर आहेत. एकीकडे तेलापासून सर्व ऐवजांचे दर वाढत आहेत. असे असताना इतके कमी दर कंत्राटदार कंपनीला परवडतात कसे असा प्रश्न पडतो. विशेष म्हणजे, कंत्राटदार कंपनीला कुठल्याही पदार्थाच्या दरावर सबसिडी दिली जात नाही. शिवाय ,दोन्ही बंगल्यांवर असलेल्या त्यांच्या कँटिनचे सरकार निश्चित करेल ते भाडे भरावे लागते. ‘एखादा खाद्यपदार्थ प्रत्यक्षात १० प्लेट द्यायचा पण कागदावर २० प्लेट दाखवायचा अशी ‘अॅडजेस्टमेंट’ करावीच लागते असे अन्य अशा शासकीय पुरवठ्याचा अनुभव असलेल्या कंत्राटदाराने सांगितले. एकूण ४४ पदार्थ केवळ ११०० रुपयात पुरविण्याच्या अटीवर हे कंत्राट मे.सेंट्रल कॅटरर्स यांना देण्यात आली आहे.
इतक्या स्वस्त दरात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर पदार्थ मिळत असतील तर मग ते जनतेलादेखील मिळायला हवेत. अत्यल्प दराचे रहस्य काय त्याचा खुलासा सरकारने करायला हवा.
- शिरीष देशपांडे, कार्याध्यक्ष,मुंबई ग्राहक पंचायत.
मुंबईतील हॉटेलमधील खाद्यपदार्थांचे दर
हॉटेलचे नाव पदार्थांचे नाव पदार्थाचे ‘वर्षा’वरील
दर दर
बडे मियाँ चिकन बिर्यानी २४० रु. ११ रु.
प्रकाश दही मिसळ ७० रु. १० रु.
आस्वाद पावभाजी १२९ रु. १५ रु.
साबुदाणा वडा ६७ रु. १० रु.
कॅफे मद्रास मसाला दोसा ८५ रु. ११ रु.
साधा दोसा ६५ रु. १० रु.
शासनाने खाद्य पदार्थांचे दर ठरवून दिलेले आहेत. त्यानुसार निविदा भरावी लागते आणि ती मंजूर केली जाते. हे दर ‘वर्केबल’ करावे लागतात. दुसरा काही मार्ग नाही. - सुधाकर शेट्टी, मालक, मे.सेंट्रल कॅटरर्स