वांद्रे पूर्व पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांचा दारुण पराभव केल्यानंतर परिसरात दाखल झालेल्या शिवसेना कार्यकर्त्यांच्या कल्पकतेला अक्षरश: उधाण आले होते. चपला दाखवत आणि कोंबड्या भिरकावत शिवसेना स्टाईलने शेरेबाजी करत नारायण राणेंच्याविरोधात असलेला राग या निमित्ताने बाहेर आला.शिवसेनेच्या उमेदवार तृप्ती सावंत यांचा विजय जवळपास झाल्यानंतर वांद्र्यातल्या शिवसैनिकांच्या कल्पकतेला जणू बहर आला होता. सावंत यांच्या विजयापेक्षाही नारायण यांचा पराभव झाल्याच्या बातमीनेच शिवसैनिक सुखावत होता. विशेषत: शिवसेना स्टाईलने सैनिकांच्या घोषणा सुरू होत्या. ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’, ‘उद्धव ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘शिवसेना अंगार है, बाकी सब भंगार है...’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. नारायण राणे यांच्या विरोधातील राग प्रकट करण्यासाठी शिवसैनिकांनी अक्षरश: जोडे हातात घेतले. अविनाश भोसले यांनी नारायण राणेंचा पराभव झाल्याखेरीज पायात चपला न घालण्याची अनोखी शपथ घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनी चपला हाती घेतल्या होत्या. कोंबड्यांवर अन्याय का ? प्राणिमित्र संघटनेचा सवालराणे यांना खिजवण्यासाठी शिवसेनेने विजयोत्सवात जिवंत कोंबड्या भिरकावल्या. मात्र ‘पेटा’ या प्राणिमित्र संघटनेने सेनेच्या या कृतीचा निषेध नोंदवला आहे. शिवाय ही कृती कायद्याचे उल्लंघन करणारी असल्याचेही ‘पेटा’ने नमूद केले आहे. यावेळेस कोंबड्यांचे झालेले हाल कोणालाच पाहवले नाहीत. त्यामुळे ‘पेटा’ या प्राणिमित्र संघटनेने शिवसैनिकांच्या कृतीचा निषेध केला.मतमोजणी केंद्राकडे राणे, काँग्रेसची पाठ : पोटनिवडणुकीचा निकाल पहिल्या काही फेऱ्यांतच स्पष्ट होत गेला. तेव्हा प्रचारांत राणेंसमवेत दिवस-रात्र फिरणारे कॉँग्रेसचे नेते मतमोजणी केंद्रावर फिरकलेही नाहीत. स्वत: राणे हेही जुहूतील बंगल्यात होते. त्यांचे पुत्र नितेश राणे व मुंबई कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह हे सुरुवातीला थोडा वेळ थांबले होते. मात्र सेना उमेदवारापेक्षा दहा हजारांनी पिछाडीवर गेल्यानंतर स. 9:30 च्या सुमारास त्यांनी कार्यालय सोडले.राणेंच्या बंगल्याबाहेर शिवसेनेची दिवाळी !मनोहर कुंभेजकर - जुहूवांद्रे (पूर्व) विधानसभेच्या झालेल्या पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे पराभूत उमेदवार नारायण राणे यांच्या जुहू तारा रोड, किशोरकुमार गांगुली मार्गावरील बंगल्याबाहेर शिवसैनिकांनी जणू दिवाळी साजरी केली. फटाक्यांची जोरदार आतषबाजी करत शिवसैनिकांनी आनंदोत्सव साजरा केला. त्यानंतर काहीवेळ तणाव निर्माण होऊन शिवसैनिक आणि राणे यांचे सुमारे ५०० कार्यकर्ते एकमेकांसमोर भिडले. दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. पण पोलिसांची मोठी कुमक वेळेत पोहोचल्याने त्यांनी हा जमाव पांगवला. शिवसेनेच्या उमेदवार तृप्ती सावंत यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली होती. सावंत विजयी होणार हे निश्चित झाल्यानंतर वांद्रे (प.) येथील शिवसेना उपविभागप्रमुख जितेंद्र जनावळे यांच्यासह नगरसेविका भावना मांगेला, शाखाप्रमुख प्रफुल्ल घरत, सुनील मोरे आणि शरद प्रभू यांच्यासह सुमारे ५०-६० शिवसैनिक जुहू येथील नारायण राणे यांच्या बंगल्यासमोर जमले. त्यांनी जोरदार फटाकेबाजी करत जणू दिवाळीच साजरी केली. ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘शिवसेनेचा विजय असो’ अशा जोरदार घोषणाही त्यांनी दिल्या. मातोश्रीच्या अंगणात राणे पराभूत झाल्याने शिवसैनिकांनी त्यांच्या बंगल्यासमोर दिवाळी साजरी केल्याची प्रतिक्रिया जितेंद्र जनावळे यांनी ‘लोकमत’ला दिली.
कोंबड्या, चपला आणि वाघ!
By admin | Published: April 16, 2015 2:17 AM