मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार आणि आयोगाचे दोन आयुक्त हे २६ सप्टेंबरपासून तीन दिवस मुंबई दौऱ्यावर येत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात ते आढावा घेतील.
राजीव कुमार यांचे २६ सप्टेंबरला रात्री मुंबईत आगमन होईल. २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता ते राजकीय पक्षांची बैठक घेतील. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या निवडणुकीसंदर्भातील अडीअडचणी, मागण्या यावर बैठकीत चर्चा होईल. निवडणुकीशी संबंधित केंद्रीय राखीव पोलिस दलाचे अधिकारी, राज्याचे पोलिस अधिकाऱ्यांची त्यानंतर बैठक घेतील. राज्याचे मुख्य सचिव, पोलिस महासंचालक, वरिष्ठ पोलिस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची ते स्वतंत्र बैठक घेणार आहेत. २८ सप्टेंबरला राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांची बैठक मुख्य निवडणूक आयुक्त घेतील. त्यानंतर निवडणुकीच्या तयारीसंदर्भातील ते पत्र परिषदेत माहिती देणार आहेत.
मतदार नोंदणीची अजूनही संधी
निवडणूक आयोगाने आतापर्यंत राज्यातील निवडणुकीसाठीच्या मतदान यंत्रांची तपासणी भारत हेवी इलेक्ट्रिकल्सच्या अभियंत्यांकडून करवून घेतली आहे, तसेच अंतिम मतदार याद्याही प्रसिद्ध केल्या आहेत. लोकसभा निवडणुकीपेक्षा विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्रांची संख्या वाढविण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. मतदार नोंदणी करण्याची संधी अजूनही आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसाच्या दहा दिवस आधीपर्यंत मतदार नोंदणी करता येते.