ऑनलाइन लोकमत
मुंबई दि. ७ - मुंबईसाठी सीईओ नेमणे म्हणजे महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा डाव आहे असा आरोप करत शिवसेनेचे खासदार राहूल शेवाळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या निर्णयाला विरोध केला आहे. देशाची आर्थिक राजधानी असणा-या मुंबईतील विकासाकामासांठी मुख्य कार्यकारी अधिकारी दर्जाच्या अधिका-याची नेमणूक करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता. मात्र शिवसेनेच्या या भूमिकेमुळे वाटाघाटींना शिवसेनेच्या तडा जाईल अशी शक्यता निर्माण झाली आहे.
आधीच मुंबई पालिका आयुक्त थेट मुख्यमंत्र्यांच्या नियंत्रणात असताना हा निर्णय घेण्याची गरज नाही असं मुंबई महापालिकेत तीन वेळेस स्थायी समितचे अध्यक्ष राहिलेल्या शेवाळेंच म्हणणं आहे. मुख्यमंत्र्यांचा त्यांच्या कारभारावर विश्वास नाही, असे दिसत असल्याची टीकाही त्यांनी केली.
तर शिवसेनेचा हा विरोध अनाठायी असून मुख्यमंत्र्याच्या निर्णयाला विरोध म्हणजे मुंबईच्या विकासाला विरोध असल्याची प्रतिक्रिया भाजपा नेते आशिष शेलार यांनी दिली आहे. मुंबईच्या विकासाची गती वाढवण्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला असून शिवसेना याचे भांडवल करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे. विरोधी भूमिका घेऊन सेना जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप करत शेलार यांनी सेनेला प्रत्युत्तर दिले आहे.