लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: गरिबांवरील उपचारासाठी वैद्यकीय मुख्यमंत्री सहायता निधीतून विशिष्ट रक्कम मदतीच्या रूपाने दिली जाते. तातडीने मदत करण्याचा या योजनेचा उद्देश आहे. रक्कम कशी मिळवायची, अर्ज कुठे करायचा या बाबतीत माहिती रुग्णांच्या नातेवाइकांना नसते. त्यासाठी सरकारने आता एक मोबाइल नंबर दिला आहे. मिस्ड कॉल केला की निधी अर्ज मिळू शकेल.
वार्षिक उत्पन १.६० लाख हवे
मुख्यमंत्री वैद्यकीय निधीच्या अर्जात काही अटी आहेत. त्यात उत्पन्न अट वार्षिक १.६० लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
उपचारासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय निधीतून मिळते मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय निधीतून विविध दुर्धर आजारांवरील उपचार, शस्त्रक्रियांसाठी निधी दिला जातो. दर महिन्याला दीड ते दोन हजार अर्ज वैद्यकीय मदतीसाठी दाखल होतात. अर्ज दाखल केल्यानंतर ७ दिवसांत वैद्यकीय मदत संबंधित रुग्ण दाखल असणाऱ्या रुग्णालयाच्या खात्यात रक्कम जमा केली जाते. या निधीतून गंभीर भाजलेल्या किंवा शॉक लागलेल्या रुग्णाला ५० हजारांची मदत दिली जाते.
अर्जासाठी या मोबाइलवर द्या मिस कॉल
अर्जासाठी ८६५०५६७५६७ या मोबाइल नंबरवर मिस कॉल द्या. अर्जाची लिंक समोर येईल. लिंकवर क्लिक केल्यावर अर्ज डाउनलोड होईल. अर्जाची प्रिंट काढावी. अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे देऊन पोस्टाद्वारे किंवा स्कॅन करून पीडीएफच्या स्वरूपात cmrf.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पाठवायचा.
चार महिन्यांत २५ लाखांची करण्यात आली मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाने जानेवारी २०२३ मध्ये १,०६० रुग्णांना ८ कोटी ८९ लाख तर फेब्रुवारी २०२३ मध्ये १,२३७ रुग्णांना १० कोटी २७ लाख, मार्च २०२३ मध्ये १,४६९ रुग्णांना ११ कोटी ९५ लाख तर एप्रिलमध्ये विक्रमी १,९८४ रुग्णांना ९ कोटी ९३ लाख रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली. या कक्षाने अवघ्या दहा महिन्यांत ८,१९२ रुग्णांना एकूण ६० कोटी ४८ लाख रुपयांची मदत दिली असल्याचे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष मंत्रालय, विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांचे म्हणणे आहे. याचा चांगला फायदा होतो, असेही म्हणाले.