Join us  

मुख्यमंत्र्यांनी दिलेली घरे परत मागितली! तानसा प्रकल्पग्रस्त: आज काढणार मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 2:21 AM

मुंबई : विद्याविहार येथील तानसा पाइपलाइननजीकच्या ४०० प्रकल्पग्रस्त झोपडीधारकांना, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कुर्ला येथील एचडीआयएल एसआरए इमारतीमध्ये घरे दिली होती. मात्र, महापालिकेने आता ही घरे परत मागितल्याने, प्रकल्पग्रस्तांना धक्का बसला आहे. परिणामी, या रहिवाशांनी एन वॉर्ड कार्यालयावर गुरुवारी धडक मोर्चाची हाक दिली आहे.स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पालिकेने प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करताना कुर्ला येथे घरे दिली. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चावी वाटपाचा कार्यक्रम पार पडला. या वेळी चावीसोबतच ताबा पत्रेही देण्यात आली. मात्र, आता महापालिकेने घरे रिकामी करण्याची नोटीस दिली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमांसह संतापाची भावना निर्माण झाली आहे. त्या विरोधात जाब विचारण्यासाठी ४०० रहिवाशी महापालिकेच्या वॉर्ड कार्यालयावर धडकणार आहेत, शिवाय रहिवाशांनी उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे.या आधी उच्च न्यायालयाच्याच आदेशानुसार, महापालिकेने सोडत काढून एकूण १ हजार २०० प्रकल्पग्रस्तांपैकी ४०० प्रकल्पग्रस्तांना कुर्ला येथे घरे दिली होती. या वेळी ताबा पत्र मिळाल्याने, रहिवाशांनी एचडीआयएलकडून ना हरकत प्रमाणपत्र घेऊन, घरांमध्ये सजावटीस सुरुवात केली, शिवाय वीजदेयक, शिधावाटप पत्रिका, गॅस जोडणी, आधार कार्ड अशी सर्व कागदपत्रेही मिळविली. बहुतेक प्रकल्पग्रस्तांचे पाल्य नजीकच्या शाळा व महाविद्यालयांत शिक्षण घेत आहेत. मात्र, अशा परिस्थितीत महापालिकेने २५ जुलै रोजी घरे रिकामी करण्याची नोटीस पाठविली आहे. त्यामुळे या नोटीसमुळे कोणत्याही नागरिकाचे काही बरे-वाईट झाल्यास, त्यास सर्वस्वी सरकार आणि महापालिका प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा स्थानिक रहिवासी सुदाम वाडकर यांनी दिला आहे.