Join us

वर्धा-यवतमाळ रेल्वे २०१९मध्ये धावणार, विजय दर्डा यांच्याशी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 5:20 AM

वर्धा ते यवतमाळ या रेल्वेमार्गावरील वाहतूक २०१९ अखेर निश्चितपणे सुरू होईल आणि यवतमाळ ते नांदेड हा रेल्वेमार्गाचा टप्पा २०२० पर्यंत पूर्ण करण्यात येईल

मुंबई : वर्धा ते यवतमाळ या रेल्वेमार्गावरील वाहतूक २०१९ अखेर निश्चितपणे सुरू होईल आणि यवतमाळ ते नांदेड हा रेल्वेमार्गाचा टप्पा २०२० पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकमत मीडियाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांच्याशी मुंबईत झालेल्या चर्चेत दिले.वर्धा ते यवतमाळ या रेल्वेमार्गासाठी विजय दर्डा यांनी दीर्घकाळ विविध मार्गांनी संघर्ष आणि पाठपुरावा केला आहे. या रेल्वेमार्गासाठी आपण केलेल्या अथक पाठपुराव्याची मला कल्पना आहे. विदर्भ, मराठवाड्याच्या विकासाला चालना देणारा हा रेल्वेमार्ग आहे आणि म्हणूनच तो एका विशिष्ट कालमर्यादेत पूर्ण व्हायवा हवा, हे माझेही प्रयत्न आहेत. त्यामुळेच रेल्वे खात्याशी यासंदर्भात सातत्याने समन्वय साधण्यात येत आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चेत स्पष्ट केले.या रेल्वेमार्गाच्या कामाची सद्य:स्थिती, कामासंदर्भातील प्रगती आणि येत असलेल्या अडचणींची विजय दर्डा यांनी या भेटीत मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. त्या वेळी या प्रकल्पासाठी राज्य शासनाचा आर्थिक वाटा उचलण्यात आपण सदैव तत्पर असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.वर्धा ते यवतमाळ या रेल्वेमार्गाचे भूमिपूजन फेब्रुवारी २००९ मध्ये करण्यात आले होते. २७० किलोमीटर लांबीचा हा रेल्वेमार्ग आहे. या मार्गावर एकूण २७ रेल्वे स्थानके प्रस्तावित आहेत. या प्रकल्पाची सध्याची किंमत १ हजार ६०० कोटी रुपये एवढी आहे. यात केंद्र सरकारचा वाटा ६० टक्के, तर राज्य सरकारचा वाटा ४० टक्के आहे. आतापर्यंत केंद्र व राज्य सरकारने मिळून १६० कोटी रुपये या प्रकल्पासाठी दिले आहेत.

टॅग्स :रेल्वे