मुख्यमंत्रिपद भाजपकडेच,शिवसेनेला निम्मी मंत्रिपदे; सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2019 06:29 AM2019-11-06T06:29:43+5:302019-11-06T08:09:27+5:30

सत्तास्थापनेचा तिढा सुटणार : मध्यस्थांमार्फत सत्तावाटपाचा फॉर्म्युला निश्चित

Chief Minister to BJP; Half of the Ministers to the Shiv Sena in maharashtra government | मुख्यमंत्रिपद भाजपकडेच,शिवसेनेला निम्मी मंत्रिपदे; सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार

मुख्यमंत्रिपद भाजपकडेच,शिवसेनेला निम्मी मंत्रिपदे; सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार

googlenewsNext

यदु जोशी

मुंबई : भाजपकडेच पाच वर्षे मुख्यमंत्रिपद व शिवसेनेला महत्त्वाच्या खात्यांसह निम्मी मंत्रिपदे, असा सत्तास्थापनेचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला असून याची घोषणा एकदोन दिवसांत होईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली. सत्तास्थापनेबाबत दोन्ही पक्षांमध्ये थेट चर्चा सुरू झाली नसली तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मध्यस्थांमार्फत गेले आठ दिवस संपर्कात असल्याची माहिती आहे. त्या माध्यमातूनच हा फॉर्म्युला ठरत आला आहे.

भाजपने यापूर्वी शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद आणि १५ मंत्रिपदे असा फॉर्म्युला दिला होता. मुख्यमंत्रिपदाचा आग्रह सोडायचा असेल तर निम्मी मंत्रिपदे द्या, अशी ठाम भूमिका शिवसेनेकडून घेतल्याचे समजते. मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांची संख्या ४३ पर्यंत असू शकते. मुख्यमंत्री वगळता ४२ मंत्र्यांपैकी ४ मंत्रिपदे लहान मित्रपक्षांना (रिपाइं, रासप, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम) यांना देऊन ३८ मंत्रिपदे उरतात. त्यातील निम्मी म्हणजे १९ मंत्रिपदे भाजपला व १९ शिवसेनेला अशी चर्चा होत असताना भाजपच्या श्रेष्ठींनी शिवसेनेला १६ च मंत्रिपदे द्यावीत, असे निर्देश दिल्याने शिवसेनेला अधिक काही देण्यास प्रदेश नेतृत्वाला मर्यादा आल्या आहेत. गृह, महसूल, नगरविकास व वित्त यापैकी महसूल खाते शिवसेनेकडे जाईल, हे जवळपास निश्चित आहे. नगरविकास खात्यासाठीही शिवसेना प्रचंड आग्रही आहे.
भाजप-शिवसेनेतील तणाव दूर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. भाजपवर सडकून टीका करणारे खा.संजय राऊत यांचा सूर आज नरमाईचा दिसला. मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना आग्रही असल्याचे ते पुन्हा म्हणाले. पण त्यात भाजप नेतृत्वाला टार्गेट करण्याचा सूर नव्हता. भाजप नेतृत्वाला लक्ष्य करताना राऊत पथ्य पाळताना दिसतील, असा दावा भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने बोलताना केला. भाजपला पाच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देण्याचे मान्य केल्यास प्रसिद्धी माध्यमांसमोर काय सांगायचे, असा पेच शिवसेनेसमोर आहे. मात्र, त्याला तात्विक भूमिकेचा मुलामा देऊन भूमिकेचे समर्थन केले जाण्याची शक्यता आहे.

रा.स्व.संघाची मध्यस्थी!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी काल सायंकाळी चर्चा केली. हिंदुत्वाच्या मुद्यावर युती अनेक वर्षे टिकून आहे आणि ती पुढेही टिकली पाहिजे. अयोध्येतील राममंदिर प्रश्नी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लवकरच येणार आहे, समान नागरी कायद्यासह अनेक महत्त्वाच्या विषयावर निश्चित अशी भूमिका आगामी काळात घ्यावी लागणार आहे. अशावेळी भाजप-शिवसेना एकत्र राहणे अत्यावश्यक असल्याची भावना ठाकरे यांच्यासमोर यावेळी मांडण्यात आली. सत्तास्थापनेचा फॉर्म्युला काय असावा हे दोन्ही पक्षांनी ठरवावे त्यात संघाची काहीएक भूमिका असण्याचे कारण नाही पण व्यापक राष्ट्रहित लक्षात घेऊन दोन्ही पक्षांनी सोबत असणे आवश्यक असल्याचे या पदाधिकाºयाने स्पष्ट केल्याची माहिती आहे. संघाच्या या वरिष्ठ पदाधिकाºयाचे उद्धव ठाकरे यांच्याशी वैयक्तिक अत्यंत चांगले संबंध आहेत आणि त्या संबंधांतूनच त्यांनी हा पुढाकार घेतल्याचे म्हटले जात असले तरी इतक्या मोठ्या पदाधिकाºयाचे बोलणे हे वैयक्तिक पातळीवर असू शकत नाही, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
भाजप श्रेष्ठींची हरकत
भाजपचे केंद्रीय नेतृत्व शिवसेनेला निम्मी मंत्रिपदे देण्यास तयार नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसेना आणि पक्षश्रेष्ठी यांचे समाधान करणारा तोडगा काय काढतात या बाबत उत्सुकता आहे. भाजपश्रेष्ठी शिवसेनेला फार तर १६ मंत्रिपदे द्यावीत या मताचे आहेत, असे समजते.

फडणवीस-ठाकरेंमध्ये नीरज गुंडेंची मध्यस्थी
फडणवीस आणि ठाकरे यांच्यात चर्चेसाठी मध्यस्थ म्हणून नीरज गुंडे हे भूमिका वठवत आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी युतीचा फॉर्म्युला ठरविण्यातही त्यांनी मध्यस्थ म्हणून महत्त्वाची भूमिका निभावली होती. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळचे मानले जातात. फडणवीस आणि ठाकरे या दोघांशीही त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत.

६३ आमदार (७ अपक्षांसह) असूनही अधिकची मंत्रिपदे आणि महत्त्वाची खाती पदरात पाडून घेतली तर ते शिवसेनेचे यशच मानले जाईल, तर शिवसेनेपेक्षा जवळपास दुप्पट आमदारसंख्या असल्याने पाच वर्षे मुख्यमंत्रिपद हे आपल्यालाच हवे ही भूमिका मान्य करण्यास लावणे हे भाजपचे यश असेल.

 

Web Title: Chief Minister to BJP; Half of the Ministers to the Shiv Sena in maharashtra government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.