शिवसेनेच्या सोबतीबाबत मुख्यमंत्री, दानवे बिनधास्त; महागाईच्या आंदोलनावरून राडा, तरीही सरकारमध्ये कायम राहणार
By यदू जोशी | Published: September 24, 2017 12:44 AM2017-09-24T00:44:18+5:302017-09-24T00:44:34+5:30
देवेंद्र फडणवीस सरकारमधून शिवसेना बाहेर पडणार असल्याचे बोलले जात असताना आणि शनिवारच्या महागाईच्या आंदोलनावरून दोन्ही पक्षांत राडा झाल्यानंतरही शिवसेना सरकारमध्ये कायम राहील, या बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे हे बिनधास्त आहेत.
मुंबई : देवेंद्र फडणवीस सरकारमधून शिवसेना बाहेर पडणार असल्याचे बोलले जात असताना आणि शनिवारच्या महागाईच्या आंदोलनावरून दोन्ही पक्षांत राडा झाल्यानंतरही शिवसेना सरकारमध्ये कायम राहील, या बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे हे बिनधास्त आहेत.
मुख्यमंत्री २५ सप्टेंबरला विदेश दौ-यावर जात असून २९ ला ते परततील आणि ३० सप्टेंबरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव आणि दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या समारंभाला नागपुरात उपस्थित राहतील. मुख्यमंत्री दीक्षाभूमीवर असताना त्याचवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव हे शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात भाषण देतील.
मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले की ३० सप्टेंबरला मुंबईतील दसरा मेळाव्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सरकारमधून बाहेर पडण्याची भूमिका घेणार नाहीत याची फडणवीस यांना खात्री आहे. त्यामुळेच त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमात कोणताही बदल त्यांनी केलेला नाही. सरकारबाबत कोणतीही काळजी नसल्याचे सांगत त्यांनी निकटवर्तीयांनादेखील निर्धास्त केले आहे.
सरकारच्या स्थैर्याबाबत फडणवीस बिनधास्त असल्याचे सर्वात महत्त्वाचे कारण हे त्यांचे उद्धव यांच्याशी असलेले सलोख्याचे संबंध मानले जाते. दोघांमध्ये नियमितपणे संवाद असतो. सूत्रांनी सांगितले की, शिवसेनेच्या मंत्र्यांनाही त्यांच्या पक्षाने सरकारमधून बाहेर पडावे असे वाटत नाही. त्याचवेळी चार दिवसांपूर्वी सरकारमधून बाहेर पडण्याची गळ घालणारे शिवसेनेचे आमदार आता त्याऐवजी आताच्या शिवसेना मंत्र्यांना हटवा आणि नवीन चेहºयांना संधी द्या यासाठी आग्रही बनले आहेत.
जाणकारांच्या मते, शिवसेनेच्या मुखपत्रातून भाजपा, केंद्र व राज्य सरकारवरील तीव्र टीका यापुढेही सुरू राहील. भाजपाचे प्रवक्ते, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार, शिवसेनेचे आ.अनिल परब, आ.नीलम गोºहे हे एकमेकांच्या पक्षांवर सडकून टीका करीत राहतील आणि त्याद्वारे सत्तारुढ पक्षाबरोबरच विरोधकांची ‘स्पेस’ही युतीतीलच पक्ष भरून काढतील, हे आतापर्यंतचे सूत्र पुढे कायम राहण्याची शक्यता आहे.
शिवसेना सरकारमधून अजिबात बाहेर पडणार नाही. आमचे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, याची मला खात्री आहे. आपापला पक्ष मोठा करण्याचा दोन्हींना अधिकार आहे. मात्र, सरकार चालविताना आम्हा दोघांमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. मंत्रिमंडळाच्या बैठकी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात होतात. शिवसेना आमचा मित्रपक्ष आहे आणि राहील. - खा. रावसाहेब दानवे, प्रदेशाध्यक्ष, भाजपा