मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्या सेल्फीबाबत स्पष्टीकरण दिल आहे. महाराष्ट्रातील मराठीजनांनी खूप कमी तरुण मुख्यमंत्री पाहिले आहेत. तसेच तरुण मुख्यमंत्र्यांची तरुण पत्नी महाराष्ट्रातील लोकांनी पाहिली नाही. आज सेल्फी काढायची हौस कुणाला नाही, सर्वांनाच आहे. मात्र, केवळ हलक्या विचारांचे लोक माझ्या पत्नीला ट्रोल करतात. माझी पत्नी बांधील नाही, तिला स्वातंत्र्य आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमृता यांच्या सेल्फीवरील प्रश्नाला उत्तर दिले.
आज तक वृत्तवाहिनीच्या मुंबई मंथन या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अमृता फडणवीस यांच्या सेल्फीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, मुख्यमंत्र्यांनी सडेतोड उत्तर देत ट्रोल करणाऱ्या नेटीझन्सला सुनावले. मुख्यमंत्र्यांच्या या उत्तरावर, कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या नागरिकांनी टाळ्या वाजवून उत्तराला दाद दिली. 'माझी पत्नी बांधील नाही. ती वैयक्तिक विचार ठेवते, ती तिचे काम करते. मात्र, काही हलक्या विचारांचे लोक तिला ट्रोल करतात. सेल्फी काढायची हौस कुणाला नाही, सर्वांनाच आहे. पत्नीच्या सेल्फीबाबत प्रश्न विचारा, मी वाटच पाहात आहे. उत्तर देण्यासाठी मी तयारच आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. तसेच जे तुम्ही 38-40 वर्षांच्या तरुण वयात करणार ते, 56 वर्षांच्या वयात करणार नाहीत, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी अमृता फडणवीस यांच्या सेल्फीचे समर्थन केलं आहे.
दरम्यान, मिसेस सीएम अमृता फडणवीस यांनी आंग्रिया क्रुझवर काढलेला सेल्फी चांगलाच गाजला. त्यांना नेटीझन्सकडून ट्रोल करण्यात आलं. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी अनोख्या अंदाजात या प्रश्नाला उत्तर दिलं.