Join us

उद्धव ठाकरेंना योग्य वेळी उत्तर देईन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 14:39 IST

'चौकीदार चोर है' अशी टीका करणाऱ्यांनाही नववर्षाच्या शुभेच्छा देणार का, असा प्रश्न विचारल्यावर मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरचे भाव आणि सूर बदलला.

मुंबईः 'चौकीदार चोर है' असं म्हणणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सुरात सूर मिसळत, पंढरपूर इथल्या जाहीर सभेत अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोचरी टीका करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जशास तसं उत्तर देणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ठामपणे सांगितलं.   

राज्यातील जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा उद्या देईन, असं मुख्यमंत्री पत्रकार परिषदेत मिष्किलपणे म्हणाले. तेव्हा, 'चौकीदार चोर है' अशी टीका करणाऱ्यांनाही शुभेच्छा देणार का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. तेव्हा, मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरचे भाव आणि सूर बदलला. 'ते कुणाला म्हणाले, काय म्हणाले, याची माहिती घेऊच. मी योग्य वेळी उत्तरही देणार आहे. प्रत्येकाची योग्य वेळ असते. ती योग्य वेळ येणार आहे आणि उत्तरही देणार आहे, असं त्यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता निक्षून सांगितलं. अर्थात, त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत असल्याचंही ते म्हणाले.  

शिवसेना रोज नरेंद्र-देवेंद्र जोडीवर टीकेचे बाण सोडत स्वबळाचे नारे देत आहे. भाजपासोबत सत्तेत सहभागी असूनही सरकारच्या अनेक धोरणांना विरोध करत आहे. त्यामुळे युतीतील दरी वाढतच चाललीय. अयोध्या दौरा करून उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारला थेट आव्हान दिलं. त्यानंतर, पंढरपूर इथल्या जाहीर सभेत त्यांनी चक्क 'चौकीदार चोर है' म्हणून पंतप्रधान मोदींना आरोपीच्या पिंजऱ्यातच उभं केलंय. स्वाभाविकच, ही टीका भाजपाच्या जिव्हारी लागली आहे. तरीही, पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर ताकही फुंकून पिणारे भाजपा नेते युतीसाठी प्रयत्न करताहेत. या पार्श्वभूमीवर, 'योग्य वेळी त्यांना उत्तर देऊ', असं ठणकावून सांगत देवेंद्र फडणवीस यांनी बरंच काही सूचित केलंय. 

अहमदनगर महापालिकेत शिवसेना सर्वात मोठा पक्ष असतानाही भाजपाने राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर महापौरपद मिळवलं. परंतु, यासाठी सर्वस्वी शिवसेनाच जबाबदार असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास त्यांना बिनशर्त पाठिंबा द्या, असे आदेश मी स्वतः दिले होते. मात्र सेनेनं अगदी शेवटच्या दिवसापर्यंत कुठलाच प्रस्ताव दिला नाही, मग अखेर स्थानिक नेत्यांनी महापौरपदाची निवडणूक लढवली आणि राष्ट्रवादीने स्वतःहून आम्हाला पाठिंबा दिला, असं त्यांनी स्पष्ट केलं.

 

नगरमध्ये जे घडलं त्यावरून आजच्या 'सामना'मधून तुमच्यावर टीका करण्यात आलीय, असं एका पत्रकाराने म्हणताच, 'हो का, फक्त आज आली का टीका?. हे फारच नवल झालं', अशी कोपरखळी त्यांनी मारली. 

मुख्यमंत्र्यांची संपूर्ण पत्रकार परिषद

टॅग्स :देवेंद्र फडणवीसउद्धव ठाकरेनरेंद्र मोदीभाजपाशिवसेना