Join us

दावोस दौऱ्यात मुख्यमंत्री फडणवीस आणणार राज्यात मोठी गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 09:05 IST

जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात दौरा; उद्योग विभागाची तयारी

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे २० ते २४ जानेवारीदरम्यान स्वित्झर्लंडमधील दावोस शहरातील जागतिक आर्थिक परिषदेसाठी जाणार आहेत. तेथे महाराष्ट्रात परकीय गुंतवणुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण करार होतील. या निमित्ताने महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक येण्याची अपेक्षा आहे.

मुख्यमंत्र्यांसोबत उद्योग मंत्री उदय सामंत, विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याांचे र्यांचे शिष्टमंडळ असेल. परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल असल्याची आकडेवारी फडणवीस सातत्याने देत आले आहेत. उपमुख्यमंत्री असताना त्यांनी या बाबत विरोधकांच्या टीकेला आकडेवारीसह उत्तर दिले होते. देशातील एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी ३१ टक्के गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रात झाली आहे. जुलै २०२२ पासून महायुती सरकारने २२१ विशाल प्रकल्पांना मंजुरी दिली आणि त्यामुळे ३.४८ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आली आणि त्यातून २ लाख १३ हजार रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती त्यांनी अलिकडेच माध्यमांना दिली.

यापूर्वी केलेल्या करारांचे काय झाले?

दावोसच्या आगामी दौऱ्यात कोणकोणत्या कंपन्यांशी करार करायचे यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालय आणि उद्योग विभागाचे अधिकारी तयारी करत आहेत. 

गेल्या काही वर्षांमध्ये दावोस येथे झालेले गुंतवणुकीसाठीचे करार आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कोणत्या टप्प्यांवर आहे याची माहितीही संकलित केली जात आहे.

फडणवीस यांनी २०१४ ते २०१९ या काळात मुख्यमंत्री असताना दावोसमध्ये अशा गुंतवणुकीचे अनेक करार केले होते.  

टॅग्स :देवेंद्र फडणवीसस्वित्झर्लंड