‘आरे’साठी मुख्यमंत्र्यांना वेळ नाही
By admin | Published: March 1, 2015 12:24 AM2015-03-01T00:24:23+5:302015-03-01T00:24:23+5:30
गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीत प्रस्तावित असलेल्या मेट्रो तीनच्या कारशेडला स्थानिकांनी विरोध दर्शविला आहे.
मुंबई : गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीत प्रस्तावित असलेल्या मेट्रो तीनच्या कारशेडला स्थानिकांनी विरोध दर्शविला आहे. यासह अनेक प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठकीसाठी वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप वेळ मिळत नसल्याबद्दल गृहनिर्माण आणि उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी शनिवारी खंत व्यक्त केली आहे.
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या तिसऱ्या मेट्रोच्या कारशेडचे काम आरेमध्ये सुरू आहे. यासाठी जवळपास अडीच हजार वृक्षांची कत्तल करण्यात येणार आहे. वृक्षांची कत्तल थांबविण्यासाठी रहिवाशांनी सेव्ह आरे मोहीम सुरू केली आहे. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, राज्यमंत्री रवींद्र वायकर आणि सुनील प्रभू यांनी या रहिवाशांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.
मेट्रो कारशेडमुळे निर्माण झालेल्या समस्या तसेच येथील अन्य प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे दोन ते तीन वेळा पत्रव्यवहार करून बैठकीची वेळ मागितली आहे. एवढेच नव्हे तर महसूल तसेच दुग्धविकासमंत्री एकनाथ खडसे यांनादेखील पत्र पाठविण्यात आले आहे. मंत्र्यांकडे बैठकीसाठी पत्रव्यवहार केल्यानंतरही समस्या सोडविण्यासाठी त्यांना वेळ मिळत नसल्याचे वायकरांनी सांगितले.
च्आरेमध्ये उभारण्यात येणारा मेट्रो कारशेड प्रकल्प पूर्णपणे चुकीचा आहे. येथील वनसृष्टी नष्ट झाल्यास निर्सगाचा कोप होऊ शकतो. हे टाळण्यासाठी आरे वाचवणे आवश्यक आहे. आरेमध्ये विकासकामे करताना मुख्यमंत्र्यांनी लोकप्रतिनिधींशी चर्चा करणे गरजेचे आहे. चर्चा न करताच आरेमध्ये विकासकाम सुरू करणे चुकीचे असल्याचे वायकर म्हणाले.