शिंदे गटाकडून आज पुन्हा आंदोलन; आदित्य ठाकरेंना लक्ष्य, मुख्यमंत्र्यांची एन्ट्री अन् मोलाचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 11:09 AM2022-08-25T11:09:11+5:302022-08-25T11:09:19+5:30
आज देखील विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजप आणि शिंदे गटाचे आमदारांनी घोषणाबाजी केली.
मुंबई- राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन शेवटाकडे येताना जोरदार तापलं आहे. आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. बुधावारी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर झालेल्या जोरदार राड्यानंतर वातावरण अजूनच जास्त तापलेलं आहे. आज देखील विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजप आणि शिंदे गटाचे आमदारांनी घोषणाबाजी केली. तसेच माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना शिंदे गटाकडून लक्ष्य करण्यात आलं.
व्यंगचित्राच्या बॅनरसह विधीमंडळाच्या पायऱ्यांवर शिंदे गटातील आमदारांकडून घोषणाबाजी करण्यात आली. आदित्य ठाकरेंविरोधात शिंदे गटातील आमदारांनी '५० खोके...मातोश्री ओके', '५० खोके...मुंबई मनपा ओके', 'युवराजांची दिशा नेहमीच चुकली', अशा घोषणा देखील दिल्या. शिंदे गटातील आमदारांची निदर्शनं सुरु असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानभवनात एन्ट्री झाली. यावेळी विधानभवनात जात असताना एकनाथ शिंदेंनी आमदारांना शांततेनं आंदोलन करा असा सल्ला दिला.
मुंबई- आज देखील विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजप आणि शिंदे गटाचे आमदारांनी घोषणाबाजी केली. तसेच माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना शिंदे गटाकडून लक्ष्य करण्यात आलं. pic.twitter.com/hfwKHAEPat
— Lokmat (@lokmat) August 25, 2022
तत्पूर्वी, विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करताना सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना भिडले आणि बघता, बघता आमदारांनी पायरी सोडली. शिवीगाळ, धक्काबुक्की आणि चौकातील गावगुंडाच्या भांडणासारखी आमदार मंडळी एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचा लाजिरवाणी आणि धक्कादायक प्रकार बुधवारी घडला. विधानभवन ही पवित्र वास्तू असल्याचा उल्लेख सर्वच पक्षाचे आमदार करत असतात. मात्र, त्याच पवित्र वास्तूच्या पायऱ्यांवर हा अभूतपूर्व प्रसंग घडल्याने सर्वजण अवाक झाले. आता दोन्ही बाजूच्या आमदारांना समज देण्यात येणार आहे.
आम्हीच धक्काबुक्की केली-
मागील तीन दिवस आम्हाला गद्दार बोलत होते, त्यामुळे वस्तुस्थिती सांगण्यासाठी आम्ही घोषणाबाजी केली. आम्ही त्यांचा इतिहास बाहेर काढला म्हणून मिरची झोंबली. आम्ही बांगड्या भरल्या नाहीत, अशी प्रतिक्रिया याप्रकरणाचे समर्थन करताना शिंदे गटाचे भरत गोगवले यांनी दिली. आम्हीच धक्काबुक्की केली, आम्ही घाबरणारे नाही, असा दावाही गोगावले यांनी केला. महेश शिंदे यांनी शिवीगाळ केल्याची तक्रार मिटकरी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे, तर मिटकरींनी धमकावल्याचा दावा सत्ताधारी आमदारांनी केला आहे.