Join us  

कोथळा काढायचं म्हणताय, आयुष्यात तुम्ही कोणाला चापट तरी मारली आहे का?; एकनाथ शिंदेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2022 10:58 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरेंच्या भाषणातील काही मुद्दे घेत पलटवार केला.

मुंबई- सभेनंतर परंपरेनुसार रावण दहन करणार आहोत. यावेळेचा रावण वेगळा आहे. काळ बदलतो तसा रावणही बदलतो. आत्तापर्यंत दहा तोंडाचा होता. आता ५० खोक्यांचा खोकासूर, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. 

शिवसेना ही एकट्या दुकट्याची नाही. जोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत आहात, तोपर्यंत मी पक्षप्रमुख आहे. एक जरी निष्ठावंत शिवसैनिक उठून बोलेन गेट आउट...मी असाच पायऱ्या उतरून घरी निघून जाईन, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. तसेच हॉस्पिटमध्ये असताना ज्यांच्यावर जबाबदारी दिली ते कटाप्पा कट करत होते. हा पुन्हा उभा राहूच कसा शकणार नाही. पण त्यांना कल्पना नाही, हा उद्धव ठाकरे नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

...तर त्याला हार्टअटॅक आला असता, एकनाथ शिंदेंनी सांगितला उद्धव ठाकरेंसोबतचा 'तो' प्रसंग!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरेंच्या भाषणातील काही मुद्दे घेत पलटवार केला. आम्ही कोणत्याही शिवसैनिकाला त्रास दिला नाही. आम्हाला कुणावरही अशा प्रकारचा अन्याय करुन प्रवेश करुन घ्यायचा नाही हे मी जाहीरपणे सांगतो. निष्ठावंत शिवसैनिकांनी सांगावं, पक्षप्रमुखपदाचा राजीनामा देतो असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. पण आता इमोशनल ब्लॅकमेल करता येणार नाही, अशा पद्धतीने पक्ष वाढवता येणार नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले. 

उद्धव ठाकरे यांनी भाषणात माझ्या दीड वर्षांच्या नातवावर टीका केली. पण त्याचा जन्म झाल्यानंतर तुमचं अध:पतन सुरू झालं. कुणावर टीका करायची, काय टीका करायची हे समजत नाही. पायाखालची वाळू सरकली आहे त्यांच्या. आमचे कोथळे काढणार असं ते म्हणाले, आयुष्यात कुणाला एक चापट तरी मारलीय का?, असा सवाल एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला. 

"एकीकडे पक्ष आहे अध्यक्ष नाही; दुसरीकडे अध्यक्ष आहे पण पक्षच नाही"

दिघे साहेब जेव्हा गेले तेव्हा मी जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा भेटलो तेव्हा तुम्ही दिघे साहेबांनी काय केलं? त्यांनी कसा पक्ष वाढवला? आता ठाण्यात पक्ष कसा वाढवता येईल? असं तुम्ही मला विचाराल असं वाटलं होतं. पण तुमचा पहिला प्रश्न आनंद दिघेंची प्रॉपर्टी किती आहे आणि कुणाकुणाच्या नावावर आहे ते तुम्ही विचारलंत. हे ऐकून मला धक्काच बसला होता. बाळासाहेबांची शपथ घेऊन मी हे सांगतो. आजवर मी हे बोललो नाही. मी खोटं बोलून सहानुभूती मिळवणारा नाही. आनंद दिघेंचं साधं बँकेत खातंही नव्हतं", असं एकनाथ शिंदे म्हणाले. "आनंद दिघे म्हणायचे एक दिवस ठाण्याचा मुख्यमंत्री बनवणार. तुम्ही दिघेंचेही पाय कापलेत. रामदास कदम बरोबर बोलले", असंही शिंदे म्हणाले. 

कटप्पा प्रामाणिक होता, पण तुम्ही तर दुटप्पा

उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना 'बाहुबली'तील कपट्टाची उपमा दिली. त्यावरही एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं. "आम्ही कटप्पा असू तर तो कटप्पापण प्रामाणिक होता. तुम्ही तर दुटप्पा निघालात. तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडून जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला. तुम्ही पक्ष वाढीसाठी काय केलं? कुणाला कधी चापट तरी मारलीय का? तुम्हाला कोथळा काढण्याची भाषा शोभत नाही. इथं एकनाथ शिंदेंच्या अंगावर १०० केसेसे आहेत. त्या काय चोरीच्या केसेस नाहीत. माझ्या नातवावर टीका करता. काय वेळ आली तुमच्यावर. माझ्या दीड वर्षांच्या नातवाचा काय दोष?, खरंतर रुद्रांशच्या जन्मानंतर तुमचं अध:पतन सुरू झालं. दीड वर्षाच्या बाळावर कसली टीका करता", असं एकनाथ शिंदे म्हणाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :एकनाथ शिंदेउद्धव ठाकरेशिवसेना