मुंबई - वेदांता-फॉक्सकॉर्न हा हजारो कोटींची गुंतवणूक आणि लाखो रोजगार निर्माण करणारा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने महाराष्ट्रातील राजकारण पेटले आहे. विरोधी पक्षात असलेल्या महाविकास आघाडीमधील घटक पक्षांसह विविध क्षेत्रातून शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठत आहे. दरम्यान, या टीकेला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. एवढी मोठी गुंतवणूक करणारी कंपनी दोन महिन्यांमध्ये आपला निर्णय बदलते का? असा प्रतिप्रश्न एकनाथ शिंदे यांनी विचारला आहे.
वेदांता प्रकरणावरून सध्या वाद सुरू आहे. मात्र आम्हाला सत्तेवर येऊन दोनच महिने झाले आहेत. गेल्या अडीच वर्षांत त्या कंपनीला ज्या पद्धतीने प्रतिसाद द्यायला पाहिजे होता. तसा दिला गेला नाही. आता दोन महिन्यांमध्ये ते केलं गेलं पाहिजे होतं, अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय. एखादी इंडस्ट्री जी पावणेदोन लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे, ती अशी दोन महिन्यांत निर्णय बदलते का? त्यांचा निर्णय आधीच झालेला होता, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला.
दरम्यान, वेदांता प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी संवाद साधला होता. त्यावेळी मोदींनी या प्रकल्पापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देऊ, असं आश्वासन दिल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
मात्र सध्यातरी वेदांता प्रकल्पावरून विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारची चौफेर कोंडी केली असून, त्याला प्रत्युत्तर देताना सत्ताधाऱ्यांच्या नाकीनऊ येत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे आता या वादातून मुख्यमंत्री कसा मार्ग काढतात, हे पाठणे औत्सुक्याचे ठरणार आहे.