मुंबई : दरोडा टाकणाऱ्यांनी चोरीची भाषा करणं योग्य नाही, गेली १५-२० वर्षे ज्यांनी मुंबई महापालिकेवर दरोडा टाकला. त्यांना जनतेचे हजारो कोटी रूपये कुठे गेले याचा हिशोब आता कॅग विचारणार आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात उबाठा पक्ष १ जुलैला भ्रष्टाचाराच्याविरोधात मोर्चा काढणार आहे. याबद्दल प्रश्न विचारला असता शिंदेंनी ठाकरेंवर टीका केली. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
तसेच भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आहे पण तसे काहीही होणार नाही. 'दूध का दूध आणि पाणी का पाणी' लवकरच स्पष्ट होईल. याशिवाय 'उलटा चोर कोतवाल काे डाटे' अशी अवस्था विरोधकांची झाली असल्याचे शिंदेनी सांगितले. महापालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी एसआयटी लावण्यात आली असून ती निपक्षपातीपणाने काम करेल. कोणताही राजकीय हेतू ठेवून काम करणार नाही. मुंबईचा पैसा मुंबईकराच्या तिजोरीतच राहिला पाहिजे, असे शिंदेंनी नमूद केले. १ जुलैला आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात मोर्चायेत्या १ जुलैला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात महापालिकेवर विराट मोर्चा काढणार असल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी दिली. उद्धव ठाकरे म्हणाले की, लोकांच्या मनात खदखद आहे. एकेकाळी मुंबई महापालिका साडे सहा कोटी त्रुटीत होती. परंतु शिवसेनेच्या हाती महापालिका आल्यानंतर ९२ हजार कोटी ठेवीपर्यंत तिजोरी भरली. आमच्या कारभाराने त्यात भर पडली. ठेवींमधूनच कोस्टल रोड आणि जनतेच्या उपयोगी कामे, योजना महापालिका पार पाडत होती. आता बेधडकपणे महापालिकेचा पैसा वापरला जातोय. माझ्या माहितीप्रमाणे जवळपास ७-९ हजार कोटी रुपये या ठेवींमधून आतापर्यंत वापरण्यात आला आहे. हा जनतेचा पैसा आहे. या पैशाची लूट त्याचे उत्तर त्यांना द्यावेच लागेल. त्यासाठी १ जुलैला मुंबई महापालिकेवर हा विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबईकरांच्या मनातील असंतोषाचे प्रतिक म्हणून हा मोर्चा असेल असंही त्यांनी म्हटलं.
दरम्यान, १ वर्ष झाला जर मुंबई महापालिकेत घोटाळा झालाय मग गप्प का? तुम्ही चोरी करताय, दिवसाढवळ्या करतायेत म्हणून आम्ही मुंबई महापालिकेवर मोर्चा काढतोय. यात जे जे मुंबईप्रेमी आहेत त्यांनी सहभागी व्हावे. मुंबईकरांच्या कष्टाचा पैसा लुटला जातोय, मुंबईची तिजोरी रिकामी करायची आणि मुंबईला भिकेचा कटोरा घेऊन दिल्ली दरबारी उभं करायचे हे कटकारस्थान आहे असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी भाजपा-शिवसेनेवर केला.