Join us

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात महाराष्ट्र अग्रेसर राहील, मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 12:50 PM

Eknath Shinde: विद्यापीठात होणारे संशोधन, नावीन्यपूर्ण उपक्रम यावर शिक्षणाचा दर्जा अवलंबून असतो, असे सांगून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अग्रेसर राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

मुंबई : विद्यापीठात होणारे संशोधन, नावीन्यपूर्ण उपक्रम यावर शिक्षणाचा दर्जा अवलंबून असतो, असे सांगून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अग्रेसर राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

राजभवन येथे राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या संयुक्त मंडळाची बैठक राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, सर्व विद्यापीठांचे कुलगुरू आणि अधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.      चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम सुरू करा विद्यापीठ, महाविद्यालयांनी येत्या शैक्षणिक वर्षांपासूनच चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम सुरू करावा, अशी सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली.

शैक्षणिक गुणवत्तेकडे विशेष लक्ष द्यावे     भारतीय अर्थव्यवस्थेची वाटचाल ५ ट्रिलियन डॉलरच्या दिशेने सुरू असून  सन २०३० पर्यंत हे स्वप्न साकारण्यासाठी विद्यापीठ ही मोठी शक्ती आहे. त्यामुळे विद्यापीठाने शैक्षणिक गुणवत्ता आणि सुलभता याकडे विशेष लक्ष द्यावे, असे उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आत्मनिर्भरतेचा संकल्प करावा - राज्यपाल     पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘आत्मनिर्भर भारत’च्या माध्यमातून भारताला सशक्त करण्यासाठी अभियान हाती घेतले आहे. विद्यार्थी आत्मनिर्भर झाला तर देश आत्मनिर्भर होईल म्हणून या विद्यापीठांनीही आत्मनिर्भर विद्यापीठ होण्याचा संकल्प करावा, असे आवाहन राज्यपाल कोश्यारी यांनी केले.   

टॅग्स :एकनाथ शिंदेमहाराष्ट्र सरकार