मुंबई : उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून हटवून राज्यात सत्तांतर घडविणाऱ्या एकनाथ शिंदे गट आणि भाजपनेही मंत्रिपदे देताना मुंबईवर अन्यायच केला. केवळ मंगलप्रभात लोढा यांना एकट्यालाच संधी देऊन मुंबईच्या तोंडाला पाने पुसण्यात आल्याचे पहिल्या विस्तारात स्पष्ट झाले.
भाजपकडून आशिष शेलार, अतुल भातखळकर, मनीषा चौधरी, योगेश सागर यांच्यापैकी एकाला संधी दिली जाईल, असे मानले जात होते. पण लोढा यांच्या नावाला भाजपने पसंती दिली. लोढा हे मुंबई भाजपचे विद्यमान अध्यक्ष आहेत. प्रख्यात बिल्डर असलेल्या लोढा यांना पहिल्यांदाच मंत्रिपद मिळाले. ते पाचव्यांदा आमदार आहेत. लोढा हे अतिश्रीमंतांच्या मलबार हिल मतदारसंघाचे आमदार आहेत. हा भाग दक्षिण मुंबईत येतो. या मतदारसंघात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांचे बंगले, राजभवन हा परिसर येतो.
मुंबई महापालिका निवडणूक चार - पाच महिन्यांवर असताना मुंबईला दोन्ही बाजूंकडून अधिक प्रतिनिधीत्व पहिल्या टप्प्यातच दिले जाईल, असे मानले जात होते. असे मानण्याचे दुसरे कारण हेही होते, की मुंबई हा शिवसेनेचा गड राहिला आहे. मात्र, पक्षातील ४० आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि ठाकरे-शिवसेना या समीकरणाला आणि या दोन्हींच्या मुंबईवरील एकछत्री प्रभुत्त्वाला पहिल्यांदाच जोरदार धक्का दिला.
मुंबईतील शिवसेनेचे सदा सरवणकर, यामिनी जाधव, दिलीप लांडे, मंगेश कुडाळकर आणि प्रकाश सुर्वे हे पाच आमदार शिंदे यांच्यासोबत गेले. त्यातील सरवणकर हे तर दादर - माहीमचे आमदार. शिवसेना भवन आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या लाखोंच्या सभा अनुभवणाऱ्या शिवाजी पार्क परिसराचेही आमदार. मात्र, त्यांनाही मंत्रिपदाची संधी मिळाली नाही. आता आणखी एका विस्ताराची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
मुंबईतून मराठी मंत्री नाही
मुंबईतील मराठी मतांवर शिवसेना आणि मनसे यांचा दावा राहिला आहे. एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन या मराठी मतांचे विभाजन करण्याची भाजपची रणनीती असल्याचे बोलले जाते. मात्र, भाजप वा शिंदे गटातूनही मुंबईतील एकही मराठी चेहरा मंत्री म्हणून देण्यात आलेला नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वातील शिवसेनेला टीकेची आयतीच संधी मिळाली आहे.