Join us

एकनाथ शिंदे राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीसाठी राजभवनात दाखल; राजकीय चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 9:37 PM

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीसाठी राजभवन येथे दाखल झाले आहेत.

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीसाठी राजभवन येथे दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदे हे राज्यपाल बैस यांच्या भेटीसाठी अचनाक राजभवनात आल्याने राजकीय चर्चांना उधाणा आले आहे. मात्र मराठा आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा करणार असल्याची माहिती समोर येत आहे. उद्या मंत्रिमंडळाची बैठक देखील असल्याने या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून शांततेत सुरु असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. बीडमध्ये या आंदोलनाचा सर्वाधिक फटका राजकीय नेत्यांना बसला आहे. याठिकाणी सकाळी माजलगाव येथील आमदार प्रकाश सोळुंके यांच्या निवासस्थानी दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली होती त्यानंतर आता बीडमध्ये आंदोलनाचे लोण पसरले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि राज्यपाल यांच्या भेटीत नेमकी कोणती चर्चा होणार, याची चर्चा रंगू लागली आहे. 

आज सकाळीच महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी राज्यपाल यांची भेट घेतली. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी आणि राज्यात निर्माण झालेली दुष्काळाची परिस्थिती हाताळण्यासाठी तातडीने विशेष अधिवेशन बोलवावे या मागणीसाठी रमेश बैस यांची आज महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन चर्चा केली. त्यामुळे राज्यपाल मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशनाची सूचना करु शकतात. या अधिवेशनात मराठा आरक्षणासाठी ठोस निर्णय किंवा विचार विनिमय करण्याचा निर्णय होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. 

दरम्यान, राजकीय पुढाऱ्यांबद्दल राज्यभरात मराठा आंदोलकांमध्ये संताप आहे. अनेक गावांमध्ये नेत्यांना प्रवेश बंदी केली आहे. आमदार खासदारांनी राजीनामा द्यावा यासाठी मराठा आंदोलकांकडून दबाव आणला जात आहे. त्यात भाजपाचे गेवराई येथील आमदार लक्ष्मण पवार यांनी विधानसभा अध्यक्षांकडे त्यांच्या आमदारकीचा राजीनामा पत्र पाठवले आहे. त्याचसोबत शिवसेनेचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, नांदेडचे खासदार हेमंत पाटील यांनीही मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राजीनामा दिला आहे.

आंदोलकांनी शांततेचा मार्ग सोडू नये- CM शिंदे

मराठा आरक्षणावरून राज्यात जी काही आंदोलने व उपोषणे सुरू आहेत त्याकडे आम्ही अतिशय गांभीर्याने पाहत आहोत. सरकारला मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे, कायद्याला, नियमाला धरून आरक्षण द्यायचे आहे. त्यामुळे यासाठी सर्व बाजूंचा अभ्यास करूनच निर्णय घ्यावा लागणार आहे. समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण दिले जाईल. हे आरक्षण देत असताना इतर घटकांवर अन्याय होणार नाही. यापूर्वी दिलेले आरक्षण न्यायालयात टिकू शकले नाही, असे पुन्हा घडू नये यासाठी काळजीपूर्वक पावले टाकावी लागणार आहेत. यामुळे आंदोलकांनी देखील सरकारची भूमिका समजून घेत सहकार्य करावे. मराठा समाज बांधवांनी टोकाचे पाऊल उचलू नये. मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची आम्हाला काळजी आहे. त्यांनी वैद्यकीय उपचार घ्यावेत, पाणी प्यावे. आंदोलकांनी शांततेचा मार्ग सोडू नये, असे आवाहनही एकनाथ शिंदे यांनी केले.

...तर मला वेगळा निर्णय घ्यावा लागेल- 

आज रात्री आणि उद्या रात्रीपर्यंत जाळपोळ बंद करा, अन्यथा उद्या रात्री मला नाविलाजाने वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला. जाळपोळ करणारे सत्ताधाऱ्यांचे कार्यकर्ते असावेत असा अंदाज आहे. सत्ताधाऱ्यांचे असाल, नसाल तरीही जाळपोळ बंद करा, अशी सादही मनोज जरांगे पाटील यांनी घातली. आज रात्री, उद्या दिवसा मला कुठेही जाळपोळ केलेले किंवा नेत्यांच्या घरी गेल्याची बातमी आली तर मला उद्या रात्री प्रेस घेवून वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला. 

टॅग्स :एकनाथ शिंदेरमेश बैसमहाराष्ट्र सरकारमराठा आरक्षणमनोज जरांगे-पाटील